काही लोकं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिरुर मतदारसंघातील शिवसैनिक गुरुवारी ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. जमलेल्या शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी शिवसैनिकांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘काही लोकं ‘ढळली’, पण जी खरं ‘अढळ’ आहेत ती माझ्या सोबत आहेत. काही लोकांचं नाव असतं एक करतात दुसरं’, असा सणणीत टोला त्यांनी शिंदे गटासोबत गेलेल्या माजी खासदारांना लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘माझ्यासोबत जुनी माणसं आहेतच त्यासोबत नवीन माणसं येत आहेत. म्हणजेच काय तर काही लोकं ‘ढळली’, पण जी खरी ‘अढळ’ आहेत ती माझ्या सोबत आहेत’, असं म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. नाव असतं एक आणि करतो दुसरंच असा सणसणीत टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ‘ज्या मतदार संघात शिवनेरी आहे तिकडे राजकारणामध्ये आता गद्दार लोकं आढळली नाही पाहिजेत’, असंही ते म्हणाले.

ही देवानं दिलेली संधी आहे…

‘मला स्वत:ला खात्री आहे. खात्री म्हणण्यापेक्षा मी मागेपण बोललो आहे आपल्या मेळाव्यातही बोललो आहे आणि पुन्हा पुन्हा बोलेन की आपल्याला ही देवाने दिलेली संधी आहे. देशातली लोकशाही टिकवणं, खंर हिंदुत्त्व जोपासणं वाढवणं ही आपल्याला संधी दिलेली आहे. भले हिंदुत्त्वाचा जो तोतयागिरीचा एक कळस करण्याचा प्रयत्न केला गेला. इतिहासात एक प्रकरण आहे ‘तोतयाचे बंड’. मात्र हे बंड नाही. हिंदुत्त्वावरून सध्या तोतयागिरी सुरू आहे. तोतयेगिरीला बंड दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.