शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ उद्या शनिवारी ठाण्यात धडाडणार आहे. गडकरी रंगायतन येथे शनिवारी सायंकाळी 6.30 वाजता शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असून या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचा भगवा सप्ताह अवघ्या महाराष्ट्रात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. ठाणे जिह्यातही आयोजित करण्यात आलेल्या भगव्या सप्ताहाला शिवसैनिक आणि जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील तीन दिवसांच्या यशस्वी राजकीय गाठीभेटींमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असतानाच ठाण्यातील मेळाव्यात उद्धव ठाकरे त्यांना कोणता जमालगोटा देणार, याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची ठाण्यातील शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.
गद्दारांचा समाचार घेणार
या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, गद्दार आणि विश्वासघातकी विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.