अतिवृष्टीतील अनुदानाची रक्कम न मिळाल्याने जिल्हा बँकेला शिवसेनेचा घेराव

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील खडक मांजरी येथील 2016 च्या अतिवृष्टीतील अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने आज सोनखेड येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने घेराव घालण्यात आला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा 33 लाखांचा निधी आठवडाभरात शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

2016 साली सोनखेड परिसरात आचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. शासन दरबारी हा आहवाल सादर झाल्यानंतर या भागासाठी शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 33 लाख रूपये मंजूर झाले. हे अनुदान शासनाकडून जिल्हा बँक आणि लोहा तहसील येथे वर्ग करण्यात आले. मात्र हे अनुदान देण्यास टोलवाटोलवी करण्यात येत होती. आज शिवसेनेचे नांदेड दक्षिण विभागाचे संपर्वâप्रमुख दिपक शेडे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, बाबुराव मोरे, रामकिशन नरवाडे, सुदाम बुदरूक, नामदेवराव शिकरे, ज्ञानोबा मोरे, अचुत मोरे, बापुराव अटकोरे, गणेश खोंडे, संतोष घाटोळ, राजकुमार वाळके, अशोक गौड, सुदाम शिंदे, चांदोजी जामगे आदी शेतकऱ्यांनी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोनखेड येथील नांदेड जिल्हा बँकेच्या शाखेवर धडक मारली. या प्रकरणातले सत्य नेमके काय, याचा जाब विचारून बँकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. सबंध कागदपत्रांची तपासणी करून व लोहा तहसीलदारांशी संपर्क साधून या संदर्भातील निधीची तरतूद आणि रक्कम याबाबत चर्चा केली. अनुदान उपलब्ध आहे मात्र परस्पर ताळमेळ नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना मिळाले नाही, ही वस्तुस्थीती समोर आली. येत्या आठवडाभरात 33 लाख रूपयांच्या अनुदानाचे वाटप शेतकऱ्यांना होईल असे आश्वासन बँकेच्या अधिकारी व तहसीलदारांनी चर्चा करून दिल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा देत शिवसैनिकांनी समाधान व्यक्त केले. दीपक शेडे यांनी हा प्रश्न लावून धरल्याने या भागातील शेतकऱ्यांना दोन वर्षानंतर का होईना न्याय मिळणार आहे.