
सामना ऑनलाईन । मुंबई
आर्थिक चणचणीचे कारण पुढे करत गेली 36 वर्षे लालबाग, परळ, दादर भागातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ‘चित्रा’ थिएटर अचानक बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला. त्यामुळे चित्रपटरसिकांमध्ये संतापाची लाट आहे. हे थिएटर बंद होऊ नये यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. चित्रा थिएटर बंद करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शुक्रवारी शिवसेनेने मालकांना निवेदनाद्वारे दिला.
विभागप्रमुख, आमदार सदा सरवणकर, विभाग संघटक, नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वडाळा विधानसभेच्या वतीने चित्रा थिएटरबाहेर शुक्रवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. थिएटर पुन्हा सुरू करण्यात यावे यासाठी थिएटरचे व्यवस्थापक सावंत यांना निवेदन दिले. यावेळी वडाळा विधानसभा संघटक अनिल घोसाळकर, उपविभागप्रमुख विलास राणे, राकेश देशमुख, शाखाप्रमुख नितीन पेडणेकर, विश्वास निमकर, रवी घोले, विभाग संघटक सुनीता अहिरे, उपविभाग संघटक माधुरी मांजरेकर, शाखा संघटक वंदना मोरे, युवा कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांच्यासह शिवसैनिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चित्रा थिएटर सुरू राहावे यासाठी शुक्रवारी शिवसेनेने मॅनेजर सावंत यांना निवेदन दिले. हे थिएटर बंद झाल्यास या विभागातील लोकांच्या मनोरंजनाचे साधन नाहीसे होईल आणि येथे काम करणाऱया कामगारांचा रोजगारही बुडेल. त्यामुळे हे थिएटर नुकसानभरपाईमधून बाहेर येण्यासाठी मालकांनी इतर कमर्शियल पर्याय शोधावेत.- श्रद्धा जाधव, नगरसेविका
























































