
सामना प्रतिनिधी । मुंबई
प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘बेस्ट’मध्ये आणल्या जाणाऱया प्रस्तावित इंटेलिजन्स ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमसाठी ‘इनसाईट बिझनेस प्रा.लि.’ कंपनीसाठी पायघडय़ा घालणाऱया ‘बेस्ट’ प्रशासनाला आज शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी चांगलेच धारेवर धरले. अखेर सदस्यांना समाधानकारक उत्तर न देणाऱया प्रशासनाचा निषेध करून सभा तहकूब करण्यात आली.
‘बेस्ट’ बस कधी येणार, बसचा मार्ग, प्रवासी माहिती अशा अत्याधुनिक सुविधा असणाऱया ‘आयटीएमएस’ प्रस्तावाला मार्च 2018मध्ये बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या प्रस्तावाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे काँग्रेसचे रवी राजा यांनी सांगितले. या उपक्रमाच्या कनेक्टिव्हिटीसाठी व्होडाफोन कंपनीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगणाऱया प्रशासनाने प्रस्तावात तसा उल्लेख का केला नाही, असा सवालही त्यांनी केला. लाखो रुपयांनी कमी रकमेत काम करण्यास तयार असणारी सरकारी कंपनी ‘एमटीएनल’ला डावलून बारा कोटींचे कंत्राट इनसाईट कंपनीला देण्याचा घाट प्रशासनाने का घातला आहे, असा सवाल भाजपचे सुनील गणाचार्य यांनी केला. तर बेस्ट तोटय़ात असताना प्रशासन जादा पैसे का खर्च करीत आहे, हे पैसे पालिका देणार आहे का, असा सवाल शिवसेनेचे राजेश कुसळे यांनी केला.
सविस्तर अहवाल सादर करा
सदस्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आले नाही. त्यामुळे सदस्य रवी राजा, नाना आंबोले यांनी सभात्याग केला. प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराची गंभीर दखल घेत प्रभारी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्रशासनाला सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर गणसंख्येअभावी सभा तहकूब करीत असल्याचे कोकीळ यांनी जाहीर केले.
























































