
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्र लढत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. युतीमुळे मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये शिवसेना-मनसेची ताकद वाढली असून आम्ही 115 जागा जिंकत आहोत, असा ठाम विश्वास शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शनिवारी सकाळी माध्यमांशी युतीनंतर ताकद वाढल्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले, आम्ही 115 जागा जिंकत आहोत. याक्षणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना शतक पार करताहेत. 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकू हा आत्मविश्वास आम्हाला आणि मतदारांना सुद्धा आहे.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेऊन निवडणुका लढण्याचा कल असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, शरद पवार आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेतृत्व आमच्या आघाडीत असावे, त्यांचा पक्ष असावा यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो. सुप्रिया सुळे, स्वत: शरद पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून मुंबईमध्ये आम्ही एक चांगला फॉर्म्यूला तयार केला. त्यांना ज्या जागा हव्या त्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो. त्याच्यामध्ये खरे म्हणजे शिवसेनेचे नुकसान झाले आहे. आमच्याकडच्या जागा गेल्या. पण ठीक आहे, युती किंवा आघाडीमध्ये असे होत असते आणि ते स्वीकारले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही ज्या जागा मनसेला दिल्या त्या सिटिंग जागा आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्या त्या सिटिंग जागा आहेत. तिथे आमचे लोक नाराज झाले आहेत. आमच्या लोकांमध्येही अस्वस्थता आहे. त्यांचीही संधी गेली. पण आघाडीमध्ये आणि युतीमध्ये या गोष्टी पाहायच्या नसतात. कारण ही आघाडी, युती एका विशिष्ट हेतूने झालेली असते. मुंबईचा, महाराष्ट्राचा, भाजपच्या पराभवाचा विषय आहे. भविष्यामध्ये सत्ता येईल तेव्हा अनेक पद उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला त्या सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे.
मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे
पुण्यात काँग्रेस सोबत यावी असा आमचा आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. मुंबई ही वेगळी संस्थान असे काहींना वाटते आणि ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात. पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे राऊत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले. तसेच ठाण्यात शिवसेना-मनसेचे जागावाटप पूर्ण झालेले आहे. राष्ट्रवादीशीही चर्चा झाली. त्या संदर्भात आज संध्याकाळपर्यंत निकाल मिळेल, असेही ते म्हणाले.
भाजपला ठाण्यात शिंदेंचा पराभव करायचा आहे
ठाण्याचे महत्त्व यावेळी वेगळे आहे. भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे. त्यादृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमधील निकाल वेगळे होते. ती गणितं वेगळी होती. त्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिवसेना-मनसे युती यांच्यातच लढाई होईल, असे राऊत म्हणाले.
Maharashtra Civic Polls – बंडखोरीच्या भीतीने उमेदवारांची घोषणा लांबली




























































