
महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय आणि यासाठी त्यांनी दिलेली कारणे योग्य व वाजवी नाहीत. राज्य निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट वापरण्याच्या स्थितीत नसेल, तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर (बॅलेट) घेण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.
देशातील सर्व राजकीय पक्षांशी केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला व्हीव्हीपॅटच्या अंमलबजावणीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोग जर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरण्याच्या स्थितीत नसेल, तर मतपत्रिकांवर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात यावी. ज्यामुळे ईव्हीएममधील मतदानाबाबत मतदार आणि राजकीय पक्षांच्या मनात येणार्या सर्व शंकांना पूर्णविराम मिळेल, असे आयोगाला दिलेल्या पत्रात शिवसेनेने म्हटले आहे.
– राजकीय पक्षांशी सखोल सल्लामसलत करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येऊ नये. महाराष्ट्रात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामात केंद्रीय निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून राज्य निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
ईव्हीएमवर घेण्यात येणाऱया मतदान प्रक्रियेबाबत सर्वत्र संशय आहे. त्यामुळे सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सातत्याने मांडत आहेत. व्हीव्हीपॅटमुळे आपलं मत कुठे जाते याबाबत मतदारांना थोडासा दिलासा होता. व्हीव्हीपॅटचा वापर रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. इतर राज्यांत ज्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, अशी शिवसेनेची मागणी आहे.
– अनिल देसाई,शिवसेना सचिव, खासदार
मत कुणाला दिले हे मतदारांना समजले पाहिजे – विजय वडेट्टीवार
निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. मतदाराने मत कुणाला दिले हे त्यांना समजले पाहिजे. राज्यात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट मशीनशिवाय घेऊ नयेत, या मशीन नसतील तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
ईव्हीएमचा घाट कशासाठी? – प्रशांत जगताप
व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध नसतील तर ईव्हीएम मशीनचा घाट कशासाठी? मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी अन्यथा आम्ही या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देऊ, असे राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.