महिला, तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर मिंधे सरकारच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. ‘तुमचे 1500 रुपये नकोत, आम्हाला सुरक्षा द्या, नारी आता अबला नाही, संघर्ष आमचा चालू राही’ अशा घोषणा देत शेकडो महिला दुर्गेच्या रूपात मोर्चात सहभागी झाल्या होत्या. उल्हासनगर ते कल्याण पूर्वपर्यंत निघालेल्या मोर्चात सरकारविरोधातील संताप पाहायला मिळाला.
मिंधे सरकारच्या काळात महिला आणि मुलींवरील अत्याचार आणि हत्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनांचा निषेध करण्यासाठी रविवारी सायंकाळी भव्य रॅली काढण्यात आली. तिसगाव, शिळफाटा, उरण, बदलापूर, विठ्ठलवाडी येथील अत्याचाराच्या घटना घडूनही सरकार ढिम्म आहे.
महिलांना फसव्या योजना नकोत तर सुरक्षा हवी, फुकटचे रेशन नको, अत्याचाऱ्यांना शासन करा, अशा घोषणांनी महिलांनी शहर परिसर दणाणून सोडला. उल्हासनगरातील जिजामाता उद्यान ते श्रीराम चौक, अर्पना डेअरी, रायगड कॉलनी, शंकर पावशे रोड, हनुमान नगर रोड, काटेमानिवली नाका मार्गे कल्याण पूर्वमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मशाल मोर्चा समाप्त झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, सहसंपर्कप्रमुख रमेश जाधव, जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, उपजिल्हा संघटक अंजली राऊत, उल्हासनगर शहरप्रमुख कैलास तेजी, अंबरनाथ शहरप्रमुख संदीप पगारे, कल्याण शहरप्रमुख शरद पाटील, म्हारळ शहरप्रमुख प्रकाश चौधरी, युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ म्हात्रे, कल्याण ग्रामीण शहरप्रमुख सुरेश पाटील, उपशहरप्रमुख शेखर यादव, भगवान मोहिते, शिवाजी जावळे, राजू माने, हेमंत चौधरी, संतोष गवते, शहर संघटक जया तेजी, वसुधा बोडारे, उपशहर संघटक विजय सावंत, डॉ. जानू मानकर, मीना माळवे, मंगला पाटील, रेखा येवले, बापू सावंत, रवि दिवटे, प्रा. प्रकाश माळी, अनिल लोंढे, तात्या कारकर, निवृत्ती पाटील यांच्यासह शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
तर विकृतांना धडा शिकवू
नवरात्रोत्सवाच्या काळात देवी महिषासुरमर्दिनीला साकडे घालत दुष्ट शक्तींवर मात करण्यासाठी आम्ही ‘मशाल’ पेटवली आहे. यापुढे एकाही मुलीवर, महिलेवर अत्याचार झाला तर शिवसेना विकृतांना घडा शिकवेल, असा इशारा यावेळी दुर्गेच्या रूपात सहभागी झालेल्या रणरागिणींनी दिला.
मिंधे सरकार अपयशी
मुली, महिलांची सुरक्षा करण्यात मिंधे सरकार अपयशी ठरले आहे. विकृत प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी शिवसेनेची ‘मशाल’ धगधगत राहील, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला.