कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवा – सुनिल राऊत

शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या दालनात कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबद्दल बैठक घेण्यात आली. डम्पिंगच्या बाबतीत समस्या, येणारी दुर्गंधी आणि होणारा त्रास याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. आम्ही लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊन डम्पिंगच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ, तत्पूर्वी दुर्गंधी घालवण्यासाठी औषध फवारणी आणि इतर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. या प्रश्नाबाबत एक कमिटी तयार करून त्या कमिटीत आपल्यासहित सगळय़ांना घेतलं जाईल आणि लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी चंद्रशेखर जाधव, राहुल वाघमारे, अॅड. संजय येवले, परम यादव, शंकर ढमाले आणि राजाराम राव यांच्यासह विक्रोळी विचार मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.