पंतप्रधानांच्या सोने खरेदी आवाहनावर शिवसेनेचे उपहासात्मक आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने खरेदी करू नका, पेट्रोल- डिझेल कमी वापरा, आदी काटकसरीचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारी धोरणावर सर्व स्तरांतून टिकेची झोड उठत असून, ठिकठिकाणी निषेध आणि निदर्शने होत आहेत. आज ऐतिहासिक बिंदू चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून पंतप्रधान मोदी यांच्या मनमानी कारभाराविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले.

देशात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आणि आता गॅस, पेट्रोल-डिझेल, सीएनजी, सोने-चांदीच्या दरात जमीन-आस्मानाचा फरक झाला आहे. पंतप्रधान झाल्यावर ‘अच्छे दिन’ येणार म्हटले जात होते. प्रत्यक्षात सरकारची चुकीची धोरणे आणि महागाईचा कळस पाहता संपूर्ण देशावर अत्यंत ‘वाईट दिन’ आणले आहेत. आता तर सोने खरेदी करू नका, परदेशी जाऊ नका, गाडीने फिरू नका, पेट्रोल वापरू नका, असे आवाहन करून देशवासियांसमोर मोदींनी एक नवीन संकट आणले आहे.

या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहर शिवसेनेकडून एका बैलगाडीत मोदींचा मुखवटा घालून, विडंबनात्मक आंदोलन करण्यात आले.कोल्हापुरातील नागरिकांनी काटकसर करण्यासाठी, लग्न, बारसे, स्वागत समारंभ, मुंज, जावळ, वास्तुशांती आदी कार्यक्रमावर खर्च करू नये.

गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तरी कोणी यावर आंदोलन करू नये, उलट या दरवाढीचे आणि मोदींचे पुष्पहार घालून स्वागत करावे. सोन्या-चांदीच्या दुकानांना कायमचे कुलूप घालावे, कोल्हापूर जिल्ह्यात एक वर्षासाठी जमावबंदी आदेश करावा, सोने खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, पेट्रोल पंपावर अर्धा लिटरच्यावर पेट्रोल देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी प्रसिद्ध करावे, अशा उपहासात्मक मागण्यांचे निवेदन यावेळी शिवसेनेकडून वाटण्यात आले.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख मंजित माने, विराज पाटील, राजू यादव, हर्षल पाटील, विकी मोहिते, रुपेश रोडे, राजू जाधव, दीपक गौड, शुभांगी साळुंखे, दिपाली शिंदे, महादेव कुकडे, अरुण अब्दागिरी, दिनेश परमार, विनोद खोत आदी शिवसैनिक उपस्थित होते.