दिवाळी पहाटऐवजी शिवसेनेचा धाराशीवमधील बळीराजाला आधार

दिवाळी पहाट साजरी करण्याऐवजी शिवसेनेने धाराशीवमधील बळीराजाला आधार दिला आहे. दिवाळी पहाटचा कार्यक्रम रद्द करून शिवसैनिकांनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवल्या आहेत. दानशूर तसेच सर्वसामान्य नागरिकांनीदेखील धाराशीवमधील बळीराजाला मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले आहे.

दरवर्षी गडकरी रंगायतनसमोर शिवसेनेच्या वतीने जल्लोषात दिवाळी पहाट आयोजित करण्यात येते. मात्र यंदा मराठवाड्यासह अवघ्या महाराष्ट्रात जणू आभाळ फाटले आणि हजारो हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे सर्वस्व या पावसाने हिरावून नेले. धाराशीवमध्ये तर असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यांच्यासाठी शिवसेना पुढे सरसावली असून औषधे, धान्य व अन्य साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवले आहे.

माणुसकीचा दिवा लावा
ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनीदेखील यंदाच्या दिवाळीत बळीराजा-साठी माणुसकीचा दिवा लावावा आणि सढळ हातांनी शेतकऱ्यांना मदत द्यावी असे शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे. मराठवाड्यात जाऊन आपणही या शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.