उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल, आज इंडिया आघाडीची बैठक

पावसाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार असून आज त्यांचे दिल्लीत आगमन झाले. दिल्लीत त्यांचे जोरदार स्वागत झाले. बऱयाच कालावधीनंतर होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या या दौऱयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

दिल्लीत गुरुवारी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बैठकीचे निमंत्रक आहेत.

त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी पह्नवर चर्चा करून बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यांच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे. मतदार फेरपडताळणी, टॅरिफ असे मुद्दे प्रामुख्याने बैठकीत चर्चिले जाण्याची शक्यता आहे.

शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी प्रतिभा पवार, रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, फौझिया खान, अमोल कोल्हे, संजय दिना पाटील, नीलेश लंके, भास्कर भगरे, धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर, सलील देशमुख उपस्थित होते.

विमानतळावर जंगी स्वागत

राजधानीत उद्धव ठाकरे यांचे जोश आणि जल्लोषात स्वागत झाले. उद्धव ठाकरे विमानतळाबाहेर येताच शिवसैनिकांनी त्यांना गराडा घातला. पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही यावेळी सोबत होते. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा’, ‘शिवसेना झिंदाबाद’ अशा घोषणांनी यावेळी आसमंत दणाणून गेला.

सरकारला सळो की पळो करून सोडा!

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग लेन या निवासस्थानी शिवसेनेच्या लोकसभा व राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा आहे. त्यांना जनहिताशी काही देणेघेणे नाही. पण जनहितासाठी लढय़ाचा शिवसेनेचा जन्मापासूनचा बाणा आहे. जनहिताच्या मुद्दय़ावर तुम्ही जोरदार आवाज उठवा आणि सरकारला सळो की पळो करून सोडा, असा आदेशच उद्धव ठाकरे यांनी खासदारांना दिला. खासदारांच्या विविध अडचणीही त्यांनी समजून घेतल्या. बैठकीला शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय ऊर्फ बंडू जाधव, राजाभाऊ वाझे, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, प्रियांका चतुर्वेदी हे उपस्थित होते.