
भंडारा शहरातील धार्मिक महत्त्व असलेल्या प्राचीन खांब तलावाचे सौंदर्य करण्याचे काम राज्य शासनाच्या नगर विकास खात्यामार्फत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागील चार वर्षापासून सुरू आहे. सौंदर्यकरणाच्या कामांतर्गत जी काही कामे सुरू आहेत अथवा झालेली आहेत त्या कामांच्या दर्जा अगदीच सुमार असल्यामुळे, कामे निकृष्ट दर्जाची असल्यामुळे मागील काही दिवसापूर्वी ह्या खांब तलावामध्ये रिटेनिंग वॉल (संधारक भिंत ) चे काम सुरू असताना जवळपास ५० फूट भिंत पडलेली होती आणि त्याहून जास्त लांबीची भिंत झुकलेली आहे, पडण्याच्या मार्गावर आहे.
ह्या सबंधीची तक्रार २८ जुलै २०२५ ला राज्याचे मुख्यमंत्री तसेच नगर विकास मंत्री यांना दिलेली होती. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. कार्यवाही होणे अपेक्षित सुद्धा नव्हते. कारण ‘ चोर चोर मावस भाऊ,सारे मिळून आपण महाराष्ट्राला खाऊ ‘ याच धर्तीवर सध्याचे राज्य सरकार काम करीत असल्याचा अनुभव राज्यातील जनतेला येत आहे.
सदर खांब तलाव सौंदर्यकरणाच्या कामावर अंदाजे ४० करोड रुपये खर्च अपेक्षित असून आतापर्यंत जवळपास ७०% खर्च झाल्याचे खात्रीलायक रित्या समजते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे असताना एकाही कामाच्या, कामाचे स्वरूप, कामाची अंदाजे रक्कम, काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव दर्शविणारा एकही फलक न लागणे, तिथल्या तिथेच थातूरमातूर कामे दाखवून करोडोचे बोगस बिल दिले काढण्याचे प्रकार होत आहेत.
शिवाय ह्या कंत्राटदारांना अशा प्रकारचे कामे करण्याचा कोणताही अनुभव नसताना यांना सदर कामे हे राजकीय आशीर्वादाशिवाय मिळू शकत नाही, यासाठी केवळ टक्केवारीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना तर्फे यापूर्वी दिलेल्या निवेदनातून करण्यात आला होता.
परंतु शासन प्रशासन दरबारी कार्यवाही होत नाही म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षातर्फे शहरातील नागरिकांमध्ये सदर भ्रष्टाचाराविषयीची जनजागृती करण्यासाठी शिवसेना ने भंडारा शहरातील चौका चौकात अनेक ठिकाणी बॅनर लावून ” भ्रष्टाचार पे चर्चा ” असे अभिनव आंदोलन सुरू केले असून शहरातील नागरिकांमध्ये सदर भ्रष्टाचाराची खमंग चर्चा आहे.