उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होऊन राज्याला स्थिर सरकार द्यावे! – प्रा. जोगेंद्र कवाडे

दिल्लीशी टक्कर देणाऱ्या शिवसेनेचे कौतुक केले पाहिजे. त्यामुळे भाजपच्या जोखडातून मुक्त झालेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे आणि काँग्रेस -राष्ट्रवादी या पक्षांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राला सक्षम सरकार द्यावे, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा लाँगमार्च प्रणेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. या तीन पक्षांनी गठित केलेले सरकार शेतकरी आणि राज्यासाठी चांगले काम करेल, असा विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

येथील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. कवाडे पुढे म्हणाले की, दिल्लीच्या तावडीतून शिवसेना सुटली याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हिमतीचे कौतुकच केले पाहिजे. कारण हे इतके सोपे नाही. पण अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यातून शिवसेनेने आपला बाणा दाखवून दिला आहे. त्यामुळे एका अर्थाने शिवसेना भाजपपासून दूर झाली हे बरे झाले. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन शिवसेनेने सरकार बनवावे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने राज्याला परिवर्तनवादी सरकार मिळणार असून, हे तिन्ही पक्ष महाराष्ट्राचे हित जोपासणारे असल्याने या तिघांचा सेक्युलर फोर्स राज्याच्या विकासासाठी चांगले काम करेल. कारण राज्यात सत्ता समीकरणे जुळवत असताना शरद पवार आज विदर्भात, तर उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती पाहण्यासाठी गेले आहेत.

दिल्लीला टक्कर देणे हे मोठे धाडस असून, शिवसेनेने ते केलेले आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसने कुठलीही अट टाकली नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात सरकार लवकर स्थापन होण्याची गरज आहे. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने दोन्ही काँग्रेसला पत्र लिहून सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.

शिवसेना आता महाराष्ट्रवादी
आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष चालणार का या प्रश्नावर ते म्हणाले की, शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी असला तरी आता महाराष्ट्रवादी आहे. वैचारिक परिवर्तनातून सत्ता येते. त्यामुळेच शिवसेना सोबत आली तर पाच वर्षे स्थिर सरकार देणे शक्य असून, घटक पक्ष म्हणून यामध्ये आम्हालाही सत्तेचा वाटा मिळायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

…तर उद्धव ठाकरे का नाही
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत काँग्रेसने अट घातल्याची चर्चा आहे. याबाबत कवाडे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात तर उद्धव ठाकरे का नाही? ते मुख्यमंत्री झाल्यास या आघाडीमुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भाजपमुक्त करण्याची संधीदेखील मिळणार असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या