राज्यात ओला दुष्काळ, उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्यात

1853

यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. ओल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजुरांना तातडीच्या मदतीची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या रविवारी मराठवाडय़ाचा दौरा करून या ओल्या दुष्काळाची पाहणी करणार आहेत आणि अडचणीतील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत.

पाऊस लांबल्याने तसेच वादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भात, सोयाबीन, कांदा, द्राक्षपिके उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो एकरातील फळबागा नष्ट झाल्या आहेत. भातशेती वाहून गेली आहे. शेतकरी, शेतमजूर, बागायतदार, मच्छीमार चिंतातूर झाले आहेत. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती.

– रविवारी सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील कानडगाव येथून उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाला सुरुवात होणार आहे. तेथून नंतर ते वैजापूर येथील गारज येथे जाऊन पाहणी करणार आहेत. दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱयांची भेट घेऊन ते एकंदर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱयामध्ये ते दुपारी 3 वाजता पत्रकारांशीही संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या