एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमधील कामगारांवरील अन्यायाच्या सर्व सीमा व्यवस्थापनाने पार केल्याचे समोर आले आहे. व्यवस्थापनाने नुकतेच कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यासाठी पगारातून अनामत रक्कम म्हणून महिना 15 हजार ते 22500 रुपये कापून घेण्यासाठी परिपत्रक काढले होते. हा प्रस्ताव मागे घेऊन कर्मचाऱ्यांना कंपनीने मोफत गणवेश द्यावा, अन्यथा शिवसेनेचा बडगा दाखवण्याचा इशारा स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने दिला आहे.
जोपर्यंत अनामत रक्कम न घेता मोफत गणवेश दिला जाणार नाही तोपर्यंत कामगारांनी गणवेश घेऊ नये असे आवाहन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते, सचिव, खासदार अनिल देसाई यांनी केले असून कंपनीच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली करून कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे.
कर्मचाऱ्यांना नियमानुसार महागाई भत्ता दिला जात नाही. जुन्या कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती दिली जात नाही. महिला कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत विमानतळावर थांबवले जाते. महिला कर्मचाऱयांना रात्री ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था नाही. अतिरिक्त काम केल्यानंतरही ओव्हरटाईम दिला जात नाही. सर्व कर्मचाऱ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांसह सर्वांवर अन्याय करत आहे. व्यवस्थापनाला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल देसाई यांनी दिला आहे.