महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटणार, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार – संजय राऊत

9853
sanjay-raut-action

‘शपथग्रहण होणार आणि महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटणार. शपथग्रहण ही कुणाची ‘मोनोपॉली’ (एकाधिकारशाही) नाही. राज्याला मुख्यमंत्री मिळावा हा महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे शपथग्रहण होणारच आणि मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार’, अशा खणखणीत शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती जैसे थे आहे. सत्तास्थापनेसंदर्भात प्रत्येक पक्ष ‘वेट अँड वॉच’ अशा भूमिकेत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी रोखठोक उत्तरं दिली. ‘महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चेहरा बदलत आहे. तुम्ही ज्याला हंगामा म्हणतात तो हंगामा नाही. न्याय, सत्य आणि अधिकाराची लढाई आहे. विजय आमचाच होईल, लवकरच सरकार स्थापन होईल’, असं ते म्हणाले.

राज्यातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता आपापल्या पद्धतीने हालचाल करणारच. ज्या प्रकारचा जनादेश महाराष्ट्रात मिळाला आहे त्यामध्ये प्रत्येक पक्षाची एक भूमिका आहे. कुठल्याही एकाच पक्षाची भूमिका असं चित्र आता नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी इतकंच काय तर एक एक अपक्षाचीही भूमिका महत्त्वाची असल्याचंही ते म्हणाले.

अपक्ष आमदार राजेंद्र येडरावकर यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. या घटनेचा उल्लेख करत ‘शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. म्हणून मी म्हणतो, महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनाप्रमाणेच होईल’, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. तिथे स्थिर सरकार यावं, मुळात तिथे सरकार यावं ही भूमिका शरद पवार यांची आहे. हीच भूमिका काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आहे आणि या भूमिकेसाठीच तर उद्धव ठाकरे हे सातत्याने प्रयत्न करताहेत. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं हीच उद्धव ठाकरे यांची देखील भूमिका आहे. म्हणून तर त्यांनी आम्हाला राज्यापालांकडे पाठवलं आणि राज्यातील स्थितीवर शिवसेनेची भूमिका काय हे सांगायला सांगितलं आणि आम्ही राज्यपालांना नक्की काय घडतंय समोर आणि पडद्यामागे याची माहिती दिली’, असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील एक प्रमुख पक्ष म्हणून राज्यात काय घडतंय हे राज्यपालांना सांगणं हे शिवसेनेचं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले.

आपल्यावर होणाऱ्या टीकेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, ‘टीका करण्याची अधिकार सर्वांना आहे. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. माझ्या पक्षाची भूमिका समोर मांडतोय, माझ्या पक्षाच्या हक्कासाठी अधिकारासाठी हा संघर्ष आहे. पक्षप्रमुखांसाठी लढतोय त्यांना खोटं पाडलं जातं आहे त्याच्यावर कुणी बोलत नाही. दिलेला शब्द का पाळला नाही त्याच्यावर कुणाचं भाष्य नाही. न्याय आणि सत्याची व्याख्या बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा वेळी जर कोणी आम्हाला काही विशेषणं लावत असेल तर तो त्यांचा अधिकार, त्यांच्या विचार, त्यांचे संस्कार, त्यांची संस्कृती आहे. खरं म्हणजे ज्या विषयावर या सगळ्या मंडळींनी बोलायला पाहिजे त्यावर हे कुणी बोलत नाही. सगळ्यांना सत्तेची हाव आहे, सगळ्यांना खूर्ची सोडायची नाही, या बाबतीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. कुणाला काहीही बोलू द्या. कुणी कोणतीही टीका करू द्या. महाराष्ट्राच्या जनतेला सत्य काय आहे ते माहीत आहे’, असं ते म्हणाले.

शरद पवारांशी झालेल्या चर्चे संदर्भात प्रश्न विचारला असता पवारांशी बोलणं हा काय अपराध आहे का? ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. त्याचे 54 आमदार निवडून आलेले आहेत. त्यांच्याशी का बोलू नये? सगळ्यांनी बोलावं. त्यांच्याशी कोणकोण बोलतंय हे मला माहिती आहे. ज्यांना शरद पवारांशी आम्ही बोलल्याचा पोटशूळ उठला आहे, ते सुद्धा शरद पवार यांना कसे आणि कुठे फोन करताहेत, बोलण्याचा प्रयत्न करताहेत हे काय आम्हाला माहीत नाही काय? अशा खणखणीत शब्दात त्यांनी सवाल केला. शरद पवार असो किंवा अन्य कुणी नेते असोत त्यांच्याशी बोलण्यासंदर्भात कुणी आम्हाला विचारू नये, असंही ते म्हणाले.

शिवसेना राष्ट्रवादी सोबत येण्यासंदर्भातील बाहेर बोललं जात आहे, असं म्हणत विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं की, ‘राजनितीमें बातें उडती है, बातें उडानेवाले लोग भी होते है, बातों बातों में बहुतसी बातें बन भी जाती है, इतना ही मै कह सकता हूँ।’

आपली प्रतिक्रिया द्या