खारघरमध्ये भाजपच्या एसआयआर गोलमालचा पर्दाफाश करणाऱ्या शिवसैनिकांचा गौरव, उद्धव ठाकरे यांची पाठीवर कौतुकाची थाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खारघर येथील एसआयआर प्रकरणात शिवसेनेने केलेल्या आक्रमक पाठपुराव्याची आणि रात्रंदिवस रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या पनवेल मतदारसंघातील शिवसैनिकांच्या संघर्षाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः दखल घेतली. एसआयआर फॉर्म प्रकरणात झुंज देत गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरे यांनी कौकाची थाप देत त्यांचा गौरव केला.

एसआयआरचे फॉर्मस् बेकायदेशीररीत्या भाजप कार्यकर्त्याच्या ताब्यात जाऊन त्याच्या मोठय़ा प्रमाणावर झेरॉक्स काढल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शिवसेनेचे खारघर विभागप्रमुख बालेश भोजने यांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर शिवसैनिकांनी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस ठाण्यावर धडक देत रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन चौकशी आणि कारवाईची मागणी केली. त्यामुळे अखेर भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन पाच बीएलओंना निलंबित करण्यात आले.

या संघर्षाची दखल उद्धव ठाकरे यांनी घेतली. आज ‘मातोश्री’ निवासस्थानी या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरे यांनी कौकाची थाप दिली. यावेळी शिवसेना नेते व सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते अनंत गीते, उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, पनवेल महापालिकेच्या गटनेत्या लीना गरड, रामदास पाटील, समाधान काशीद, बालेश भोजने, सदानंद शिर्पे, कैलास पाटील, प्रवीण जाधव, यतिन देशमुख, रामदास गोवारी, विश्वास पेटकर, कोमल देहाडे, अ‍ॅड. तय्यब, अंकुश सणस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लढा थांबणार नाही

एसआयआर फॉर्म प्रकरणातील सत्य समोर येईपर्यंत आणि संबंधित दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, हा लढा थांबणार नाही, असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.