जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा, आदित्य ठाकरे उद्यापासून नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

दुष्काळग्रस्त भागात जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेवून मुक्या जनावरांना पशूखाद्य देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्यानंतर शिवसेनेचे नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्यापासून नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जन आशीर्वाद यात्रेच्या या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या स्वागताची जोरदारी तयारी सुरु असून, यानिमित्त त्यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

जानेवारी महिन्यात आदित्य ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यातील जवळपास 42 गावांना भेटी देवून शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले होते. या सर्व ठिकाणी मुक्या जनावरांना जगविण्यासाठी त्यांनी पशूखाद्याचे वाटपही केले होते. हे करत असताना थेट शेतकऱ्यांच्या घरात जावून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला होता. अवर्षणाची परिस्थिती, रब्बी हंगामात हाताशी आलेले पीक वाया गेलेले, पिकविम्याचा प्रश्न तसाच प्रलंबित, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि दैनदिन जीवन कसे जगायचे अशा व्यथा या भागातील शेतकऱ्यांनी मांडल्या होत्या. मात्र त्यावेळी सर्वांनाच धीर देवून घाबरुन जाऊ नका, निराश होऊ नका आणि आत्महत्याही करु नका, शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असा दिलासा त्यांनी दिला होता. वेगवेगळ्या शाळेतील विद्याथ्र्यांना यानिमित्ताने ड्रेसचे वाटप तर देगलूर, बिलोली मतदारसंघात पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले होते. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते आणि आपल्या पाठिशी कोणीतरी उभे आहे, अशी भावना निर्माण झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकांत शिवसेनेने मारलेली मुसंडी मराली. तसेच या निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेस मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी उद्यापासून आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा नांदेड जिल्ह्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम, विजय संकल्प मेळावा आणि शेतकऱ्यांशी हितगूज असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

उद्या सायंकाळी चार वाजता त्यांचे उदगीरहून मुक्रमाबाद येथे आगमन होणार असून, तेथे त्यांचे स्वागत आणि शेतकऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष साबणे यांनी आयोजित केलेल्या मोंढा मैदानावरील जाहीर सभेत सायंकाळी पाच वाजता ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर नरसी येथे रात्री आठ वाजता त्यांचे स्वागत होईल आणि त्यानंतर नांदेड येथे मुक्कामी येणार आहेत.

2 ऑगस्ट रोजी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड दक्षिण मतदारसंघात ज्या ठिकाणाहून शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील जे आता हिंगोलीचे खासदार झाले आहेत त्यांचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 2 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता मोहनपूरा बेटसांगवी येथे त्यांचे आगमन होईल. त्याठिकाणी उद्घाटन सोहळा आणि मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11.30 वाजता सोनखेड येथे त्यांचे आगमन होवून तेथे स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी बारा वाजता त्यांची लोहा येथे सभा होणार आहे. दुपारी दीड वाजता ते पालम मार्गे परभणी जिल्ह्यात रवाना होतील. ३ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता ते वसमत मार्गे अर्धापूरला येतील. तेथे त्यांचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात येईल. त्यानंतर वारंगाफाटा मार्गे बामणी फाटा येथे पोहंचतील. तेथेही त्यांचे स्वागत करण्यात येईल. हदगाव, हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात दुपारी अडीच वाजता ते हदगावला पोहोचतील. हदगाव येथे त्यांच्या उपस्थितीत विजय संकल्प मेळावा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ते दुपारी चार वाजता निवघा येथे पोहचतील. या सर्व कार्यक्रमांना शिवसैनिकांनी, शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार सुभाष साबणे, आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे आणि आनंदराव बोंढारकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.