बोरिवलीतील आरएमसी प्लांटच्या कामाला स्थगिती द्या! शिवसेनेची विधान परिषदेत मागणी

बोरिवलीत ना-विकास क्षेत्रात, निवासी क्षेत्राजवळ सरकारी नियमांचे उल्लंघन करून आरएमसी प्लांटचे काम सुरू आहे. या प्रस्तावित प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्लांटच्या कामाला स्थगिती द्या, अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली.

बोरिवली पश्चिमेत लिंक रोड येथील सी. टी. एस. क्र. 1490 वर सरकारी नियमांचे उल्लंघन करून आरएमसी प्लांटचे काम सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सभोवतालच्या निवासी क्षेत्रात रहिवाशांना त्रास होऊ नये याकरिता 100 मीटर अंतरावर बफर झोन उभारण्यात यावा. मात्र इथे तो उभारण्यात आलेला नाही. या प्लांटवर धूर हवेत न पसरण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच सभोवताली झाडे व भिंत उभारण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील सुमारे 2500 नागरिक त्रस्त झाले आहेत. हा आरएमसी प्लांट सुरू झाल्यानंतर होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांना श्वसनविकार, खोकला, सर्दी आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे आमदार विलास पोतनीस यांनी सभागृहात केली.

आपली प्रतिक्रिया द्या