‘शिवाई’साठी आता वीज मंडळाला साकडे!

490

एसटीच्या प्रवाशांचा प्रवास पर्यावरणपूरक करण्याबरोबरच डिझेलचा खर्चही आटोक्यात आणणाऱया इलेक्ट्रिक बॅटरीवर धावणाऱया 40 ते 50 इलेक्ट्रिक शिवाई बस येत्या दोन महिन्यांत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यांच्या चार्जिंग पॉइंटसाठी विविध आगारांत 11 के. व्ही.च्या वीज जोडण्यांची मागणी राज्य वीज मंडळाला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नाशिक ते पुणे, संभाजीनगर ते पुणे आणि सातारा ते पुणे अशा आंतर शहर मार्गांवर लवकरच एसटीचा ‘इकोफ्रेंडली’ प्रवास सुरू होणार आहे.

एसटी महामंडळाच्या आधुनिक ‘शिवाई’ विद्युत बसचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये करण्यात आले. या बस इलेक्ट्रिक बसेसना एकदा चार्ज केल्यानंतर त्या 300 कि.मी.चा पल्ला गाठणार असून या बसच्या वापरामुळे प्रदूषणात कमालीची घट होणार आहे. पारंपरिक इंधनाच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे केंद्र सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत महामंडळाने आपल्या ताफ्यात विजेवर धावणाऱया 150 इलेक्ट्रिक बसचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

  • डिझेलकरिता प्रति कि.मी. 1 रुपया 20 पैसे खर्च येतो तर विजेवरील बसकरिता प्रति कि.मी. 64 पैसे खर्च येणार आहे. विजेवरील ‘शिवाई’मध्ये 322 किलोवॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी ‘फास्ट मोड’ मध्ये एक तास तर रेग्युलर चार्जिंगसाठी पाच तास लागणार आहेत. एकदा ही बॅटरी चार्ज झाली की ही बस 300 कि.मी. धावू शकणार आहे.

11 के. व्ही. क्षमतेची वीज जोडणी हवी!

एसटीच्या आगारात चार्जिंगची सुविधा उभारण्यासाठी वीज मंडळाकडून 11 के. व्ही. क्षमतेची वीज जोडण्यांची मागणी करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत साधारण 40 ते 50 वातानुकूलित ‘शिवाई’ दाखल होणार आहेत. मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी बसेस अत्यंत चांगल्या चालत असल्याने या मार्गाचा कधी विचारच केला नव्हता अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या