शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी सोनी टिव्हीने मागितली माफी

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात एका स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला. आपल्या राजाचा असा झालेला अनादर पाहून नेटकरी संतापले होते व त्यांना सोनी टीव्हीने माफी मागण्याची मागणी केली होती. गुरुवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सोनी टीव्हीवर टीका होत होती. शिवभक्तांचा हा पवित्रा पाहून सोनी चॅनेलने वादावर पडद्या टाकण्यासाठी माफी मागितली आहे. सोनी टीव्हीने ट्विटरवरून त्यांच्या या चुकीसाठी माफी मागत त्या ट्विटमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा आदराने उल्लेख केला आहे.

केबीसीचे-11 वे पर्व सध्या गाजत असतानाच हा शो वादात सापडला आहे. केबीसीमध्ये सहभागी झालेल्या गुजरातच्या स्पर्धक शाहेदा चंद्रन यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर नेटकऱ्यांनी सोनी वाहिनी आणि बिगी यांना धारेवर धरले आणि माफी मागण्याची मागणी केली. तसेच #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग देखील सध्या ट्विटरवर पहिल्या क्रमांकाच्या ट्रेंडवर आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

गुजरातच्या शाहेदा चंद्रन यांना 6 लाख 40 हजारांसाठी एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. या प्रश्नात औरंगजेबचा मुघल सम्राट, रणजीत सिंह यांचा महाराजा असा उल्लेख होता मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवाजी असा एकेरी उल्लेख होता.

1. महाराणा प्रताप

2. राणा सांगा

3. महाराजा रणजीत सिंह

4. शिवाजी

आपली प्रतिक्रिया द्या