पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती, पण शहरात प्लॅनिंग आणि व्हिजन या गोष्टीचा अभाव राहिला. कुठल्याही योजना आल्या तरी फाइल्स अडकून राहिल्या. पुण्यात मेट्रो बनवण्याचे 2008 मध्ये ठरले होते, पण 2016 मध्ये आम्ही मेट्रोचे काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या सरकारने तर मेट्रोचा एक पिलरही उभारला नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. विकसित महाराष्ट्र विकसित देशाचे केंद्र पुणे राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचे भूमिपूजन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर विमानतळाचे उद्घाटन या सर्व प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, उदय सामंत, चंद्रकांत पाटील, शहरातील आमदार उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मला पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण करण्यासाठी यायचे होते, मात्र पावसामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. पुण्याची आधुनिकता पाहता आधीपासूनच काम करायची गरज होती. मेट्रो आधीच यायला हवी होती, पण दुर्दैव आहे. आता महाराष्ट्र राज्याला नवीन लक्ष्य ठेवण्याची गरज आहे. पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे शहराची गती कमी होऊ नये, उलट त्याचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे.
आधीच्या सरकारकडून महिलांबाबत दुजाभाव
नरेंद्र मोदी म्हणाले, मागच्या सरकारने महिलांची एण्ट्री बंद केली होती. मुलींना शाळेचे दरवाजे बंद होते. शाळांमध्ये शौचालयांचा अभाव होता. त्यामुळे मुली मोठ्या झाल्यावर त्यांना शाळा सोडावी लागायची. सैनिक शाळेत महिलांना प्रवेश नव्हता. प्रेग्नन्सीमध्ये महिलांना नोकरी सोडावी लागायची. आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदलले, जुनी व्यवस्था बदलली. शाळेत शौचालये आणली गेली. त्यामुळे मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी झाले. आम्ही आर्मी स्कूलच नव्हे तर सैन्यात अनेक पदावर महिलांना घेतले.
मंत्र्याचा मोबाईल हरवला, माईकवरून केली आनाऊन्समेंट
गणेश कला-क्रीडा येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो उद्घाटन संपन्न झाले. या भरकार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सांमत यांचा मोबाईल हरवला. यावेळी आयोजकांकडून माईकवरून मोबाईल सापडले तर आणून देण्याची विनंती करण्यात आले. यामुळे एवढी कडक सुरक्षा असताना मोबाईल हरवला जातो तर राज्यातील सर्वसामान्यांचे काय परिस्थिती असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा- सुव्यवस्थेचा पुरता बट्टय़ाबोळ उडाल्याची परिस्थिती समोर आली. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मुंबईत सुरक्षेला चकवा देऊन गृहमंत्री कार्यालयाच्या पाट्या फोडल्या जातात, तर पुण्यात भरकार्यक्रमातून मंत्र्यांचे मोबाईल गायब होतात. मंत्र्यांची सुरक्षाही किती रसातळाला गेली आहे, याचे हे उदाहरण आहे. आता मोबाईल एखाद्याने नेला असेल तर त्याला मनोरुग्ण ठरवू नका, म्हणजे झालं, असा टोला महायुती सरकारला लगावला आहे.