
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आता मऊशार हिरवाईचा गालिचा पसरवण्यात येणार आहे. ‘आयआयटी’, मुंबईने दिलेल्या धूळमुक्तीसाठीच्या अहवालानुसार हे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. धूळमुक्तीसाठी तज्ञ आणि स्थानिक रहिवाशांच्या सूचनांनुसार आणखी धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गगराणी म्हणाले.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱयांना या ठिकाणी दर्जेदार सुविधा देण्याचे निर्देश दिले. मैदान, पदपथ आणि परिसराच्या अनुषंगाने स्थानिक रहिवाशांसोबत गगराणी यांनी संवाद साधला. मैदान परिसरात सुधारणा तसेच नियमित देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, परिसरातील कट्टय़ांची दुरुस्ती करून पुरेशी प्रकाशव्यवस्थाही करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱयांना दिले. यावेळी स्थानिक शिवसेना आमदार महेश सावंत, जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते आदी याप्रसंगी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील पदपथांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्यात यावी. झाडांचे कठडे व्यवस्थित करतानाच सोप्या आणि आकर्षक रंगसंगतीने ते सुशोभित करावेत. तसेच बाक सुस्थितीत असावेत. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सुलभ आसन व्यवस्थेचे नियोजन करावे.
कट्टय़ावर विविध रंगसंगती असलेले चौकोनी टाईल्सचे तुकडे बदलून कट्टा पूर्वीसारखा करण्याची मागणी स्थानिकांनी केली. यावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्तांनी नागरिकांना दिले. तर कट्टय़ाची देखभाल नियमितपणे करावी, असे निर्देशही आयुक्तांनी अधिकाऱयांना दिले.