चिरतरुण ज्येष्ठत्व! काय म्हणतायंत शिवाजी साटम व नयना आपटे….

नुकतेच ज्येष्ठ नागरिकांचे वय साठीवर निश्चित करण्यात आले आहे. ज्येष्ठ.. आजी-आजोबा.. काय आहे ही संकल्पना.. ज्येष्ठत्व म्हणजे म्हातारपण..?? थकलेले… भागलेले… वृद्धत्व… खूप संकुचित विचार करणाऱ्यांच्या दृष्टीने असेलही कदाचित ही व्याख्या… पण आमच्या दृष्टीने मात्र ज्येष्ठत्व या संकल्पनेला खूप वेगळे आयाम आहेत… ज्येष्ठ म्हणजे वयाने… अनुभवाने… मनाने ज्येष्ठ… परिपक्व… आयुष्य आनंदाने… संयमाने भरभरून आस्वादणारे… लहानांना योग्य तो मार्ग दाखवणारे… आपल्या अनुभवाचा त्यांना फायदा करून देणारे… सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावर भरभरून प्रेम करणारे आणि प्रेम करायला शिकवणारे… आमच्या या ज्येष्ठत्वाच्या व्याख्येशी सहमत असणाऱ्या शिवाजी साटम आणि नयना आपटे या चिरतरुण… सदाबहार ज्येष्ठांची मनोगतं…

मी सतत कामात राहतो – शिवाजी साटम

shivaji-satam

मला काम करत राहायला आवडतं. मित्रांना भेटायला, त्यांच्या सोबत फिरायला जायला आवडतं. माझे मित्र मोजकेच आहेत. शक्य होईल तेव्हा त्यांना भेटतो, फोनवर गप्पा मारतो, कधीतरी छानसे नाटक पाहायला जातो, वाचतो. मराठी जुन्या चित्रपटांतील तसेच भावगीतं ऐकायला फार आवडतात. तो माझा आवडता विरंगुळा आहे. घरामध्ये नातवासोबत खेळायलाही आवडते. त्याच्या सोबत लहान होता येतं. सगळा शीण नाहीसा होतो. सहजपणे तरुण राहता येतं.

शक्य झाल्यास एखाददुसरा दिवस बाहेर फिरून यायचं. वाचन करायचं. आवडेल त्या गोष्टीत मन गुंतवा. मनाने तरुण राहायचे असेल तर असं बरंच काही करता येईल. हातपाय शिथिल करून ठेवायचे नाहीत की मनही मग सहज तरुण राहतं.

मला घरचं जेवणच आवडतं. तेही मराठमोळ्या पद्धतीचे. वरण-भात, भाजी-भाकरी, मासे, मटन आणि गावठी कोंबडीचे चिकन. अहाहा… पण या सगळ्यात माझा एका गोष्टीबाबत कायम अट्टहास असतो ती म्हणजे पालेभाजी. मला नियमित पालेभाजी खायला आवडते. एवढी आवडते की, मटनमासे असले तरी पालेभाजी लागतेच. भातही प्रचंड आवडतो, पण तब्येतीमुळे क्वचित भात खातो. माझा आहार हा मोजका आहे. त्यावर माझे नियंत्रण आहे. अति खाणे होतच नाही. मित्रांसोबत गेलो किंवा एखादी पार्टी असली तरी मोजूनमापून खातो. सतत कार्यशील असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. चालणं, फिरणं असायला हवं. ते सर्वात महत्त्वाचे आहे.

कार्यशील रहा

मी नियमित वॉक करतो. अर्धा तास अगदी जोरजोरात चालतो. एवढा फास्ट चालतो की, मला बघणारे आश्चर्यचकित होतात. कधी गुडघा दुखायला लागला की, काही दिवस बंद करतो, पण पुन्हा चालायला सुरुवात करतो. आता धावणं जमत नाही. मग चालण्यावरच भर देतो. दिवसभर शूटिंगमध्ये दहा तासांपैकी सात तास उभाच असतो. त्यामुळे मला माझ्यासारख्या साठीतल्या तरुणांना सांगायचंय की, सतत कार्यशील रहा, छान वाचन करा, संगीत ऐका, नाटक पहा, मित्रांना भेटा, गप्पा मारा, वॉक करा. अर्धा तास का होईना, पण चालायचं. तरुणांना सांगेन की, पालेभाजी नियमित खावी. पोळी नसेल तर भातात कालवून खा. त्यामुळे तब्येत ठणठणीत राहते.

जीवनाकडे सकारात्मक बघा – नयना आपटे

nayana-apte

आयुष्याकडे कसे पाहता, त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे यावर तुमचं ज्येष्ठत्व अवलंबून आहे. बऱ्याचदा शरीराने तरुण असणारी माणसं मनाने वयस्कर असतात, पण काही ज्येष्ठ माणसं मनाने तरुण असतात. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. आता ६०-६५ वय झालं म्हणून तुम्ही ज्येष्ठ झालात, पण तीच व्यक्ती चांगली कार्यशील असेल, छान काम करत असेल, आजारी नसेल, काम करण्याची क्षमताही असेल तर तो माणूस तरुणच ना. साठी-पासष्टीतील काही माणसं तर चौदा-पंधरा तासही काम करतात.

माझंच म्हणाल तर इतकी वर्षे सातत्याने काम करतेय. अभिनय माझं पॅशन आहे. त्यामुळे ते काम करताना मला ऊर्जा मिळते. माझ्या प्रोफेशनकडे मी ऊर्जा म्हणूनच बघते. कामामध्ये मी एकाग्र असते. कामाच्या वेळेत काम हेच माझं तत्त्व आहे. अभिनयाबरोबर आजूबाजूच्या घडामोडींबाबत मी अपडेट राहत असते. त्यासाठी नियमित वर्तमानपत्र वाचते. माझा जास्त कल गाण्याकडे असल्यामुळे तोच माझा रियाज आहे. कदाचित मी उत्साही असण्याचं कारण गाणं असू शकतं. मला आवडणारी गोष्टच मी करते. मुलगा, नवरा दोघंही आपापल्या व्यवसायात व्यस्त असतानाही माझ्यासाठी ते ज्या पद्धतीने वेळ काढतात, ज्या पद्धतीने माझी काळजी घेतात तेही माझ्यासाठी पूरक आहे. घरात आम्ही सगळेच सकाळी लवकर उठतो. कोणी सायकलिंगला जातं, कोणी पोहायला आणि मी वॉकला जाते, योगा करते. जेव्हा मला शूट नसतं अशावेळी संध्याकाळी दोन तास चालायला जाते.

तेलकट, मसालेदार टाळते

मी पूर्णपणे शाकाहारी असून पोळी-भाजी, आमटी-भात, कोशिंबीर असं घरगुती जेवण जेवते. शूटिंगला जाताना शक्यतो घरातूनच पोळी-भाजी घेऊन जाते. अगदीच जमले नाही तर मोड आलेली कडधान्ये, सलाड घेऊन जाते. सूप मागवता आले तर मागवते. फक्त तेलकट, मसालेदार पदार्थ खायचे टाळते. प्यावंसं वाटलं तर लिंबू सरबत पिते.