Pok चा प्रश्न नेहरू यांच्या कचखाऊ धोरणामुळेच निर्माण झाला, शिवराजसिंह चौहान यांची टीका

511
shivraj

पंडीत जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर देखील गोव्याला अनेक वर्षे पोर्तुगीज राजवटीच्या जोखडाखाली रहावे लागले. तसाच पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न पंडीत नेहरू यांच्या कचखाऊ धोरणामुळेच निर्माण झाला, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. यावेळी त्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,अशी मागणी देखील केली आहे. ते पणजी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘राहुल गांधी हे रण छोड दास झाले आहेत. लोकसभेत झालेल्या पराभवा नंतर पक्षाची पुन्हा बांधणी करायची सोडून त्यांनी मैदान सोडून पळून जाणे पसंत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जोडी श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखी असून दोघांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने जात असल्याचे चौहान म्हणाले. यावेळी चौहान यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा फटका जम्मू कश्मीर आणि गोव्याला देखील बसल्याचा आरोप केला. चौहान म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या चुकीच्या धोरणामुळे देश स्वतंत्र झाल्या नंतर देखील गोवा अनेक वर्षे पोर्तुगीजांच्या जोखडाखाली राहिला. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न पंडीत नेहरू यांच्या कचखाऊ धोरणामुळेच निर्माण झाल्याचा आरोप चौहान यांनी यावेळी केला.

चौहान यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पर्रिकर यांनी गोव्यात विकास घडवून आणला असून त्यांचा वारसा विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत चालवत असल्याचे चौहान म्हणाले. देशातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन भाजपला देश बनवायचा आहे.भाजप फक्त सरकार बनवत नाही तर देश सुद्धा बनवतो,याकडे चौहान यांनी लक्ष वेधले. देशात सध्या 3 कोटी 40 लाख सदस्य झाले असून त्यात आणखी वाढ होईल,असा विश्वास चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या