शिवराजसिंह सरकारमध्ये खातेवाटपावरून पेच!

1585

मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा जम्बो विस्तार पार पडला, पण चार दिवस झाले तरी मंत्र्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आलेले नाही. ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या समर्थकांना मलईदार आणि महत्त्वाचे विभाग मिळावेत यासाठी अडून बसल्याने शिवराजसिंह सरकारमध्ये खातेवाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेसचे सरकार पाडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे सरकार आणण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये येताना ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात मोठा वाटा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आमदार नसतानाही त्यांच्या 11 समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कमलनाथ सरकारमध्ये आपल्या समर्थकांकडे असणारी खाती मिळावीत असा आग्रह त्यांनी धरला आहे.

खातेवाटपाचा तिढा दिल्लीत सुटणार

ज्योतिरादित्य शिंदे डोईजड होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कमालीची दक्षता घेत आहेत. गेले तीन दिवस राज्यात विचारमंथन केल्यावर खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय शिवराजसिंह यांनी घेतला आहे.

गृह, महसूल, आरोग्य खात्यांवरून तिढा

गृह, महसूल, आरोग्य, परिवहन, शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, कामगार ही खाती कुणाकडे यावरून शिवराजसिंह सरकारमध्ये तिढा निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांच्याकडे गृह आणि आरोग्य ही दोन्ही महत्त्वाची खाती सध्या आहेत. ज्योतिरादित्य आपल्या समर्थकांना ही खाती मिळावीत यासाठी आग्रही आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या