युतीत सर्व समसमानच असायला हवे! उद्धव ठाकरे यांचे सडेतोड उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना-भाजप युतीची पुढची गोष्ट आता सुरू होतेय. आता व्यासपीठ हे षण्मुखानंद सभागृह नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या व्यासपीठावर मनापासून बोलावलेय. उद्या तुम्हीही कार्यक्रम घ्या आणि मला बोलवा. युतीत असाच एकोपा हवा. आपल्यात सगळं समसमान असायला पाहिजे, असे सडेतोड उद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज काढताच षण्मुखानंद सभागृह टाळय़ांच्या कडकडाटाने दणाणून गेले.

शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन आज प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी षण्मुखानंद सभागृह तुडुंब भरले होते. सभागृहाच्या दोन्ही गॅलर्‍या भरूनही मिळेल त्या जागेत शिवसैनिकांनी गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होताच ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. उद्धव ठाकरे म्हणाले, नेहमी शिवसेनेच्या वर्धापनदिनी फारसे बौद्धिक न घेता करमणुकीचा काही ना काही कार्यक्रम घेतला जातो. तेव्हा एका शिवसैनिकाने ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक सुचवले. पण आता शिवसेना-भाजप युतीची पुढची गोष्ट सुरू झाली आहे. हे नाटक नाही, तर खरीखुरी युती आहे. येता काळ संघर्षाचा आहे , पण आपल्यातला संघर्ष आता संपलाय, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहत करताच सभागृहात एकच हशा आणि टाळय़ांचा कडकडाट झाला. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तिकडे उत्तर प्रदेशमध्ये बुवा-भतिजा एकत्र आले आणि दाणादाण उडाल्यानंतर पुन्हा वेगळे झाले. शिवसेना-भाजपची युती ही अशी युती नाही. भाजप आणि शिवसेना वाद हा मूलभूत मुद्दय़ांवर होता. हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री आपण आलात. अमित शहा आले. केवळ मानेने झटकून वाद सोडवले नाहीत, तर संपूर्ण वादच संपवला. भांडत कशाला बसायचं. वेडात मराठे वीर दौडले सात नाही, तर आता एकसाथ दौडायचं, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळय़ांचा कडकडाट झाला.  

आमचं ठरलंय; सगळ्या गोष्टींचा विचार करूनच युती केलीय

हा वाद आता मिटला आहे. कोल्हापूर विधानसभेच्या प्रचारात एक चांगलं वाक्य शिवसैनिकांनी दिलं ते म्हणजे ‘आमचं ठरलंय’. त्यानुसार आमचंही सगळं ठरलंय, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच युती केलीय. भविष्यात जे प्रश्न निर्माण होऊ शकतात, पहिल्यांदाच त्यांना हात घातलाय. त्यामुळे पुढे कोणतेही तंटेबखेडे नाहीत. आमच्यात सत्तेवरून भांडणं होणार नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

पवार कंपनी तिथेच राहू दे

काय जादू आहे माहीत नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो ते एका विचारासाठी सोबत आलो. आता राधाकृष्ण विखे-पाटील जे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावत होते. आता त्यांना ठोकायचं म्हणून ठरवलं, त्यांनाही तुम्ही पक्षात घेतलं. आता दुसरे ज्यांना विरोधी पक्षनेते होताहेत त्यांनाही घेऊ नका असे अजित पवार म्हणताहेत. पण पवार कंपनी तिथेच राहू देत. त्यांना नका घेऊ, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. यावेळी सौ. रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.

आता युती झाली आहे. मैदान साफ आहे. पण मैदान जेव्हा साफ असतं तेव्हाच तंगड्यात तंगडं घालून पाडण्याचा धोका अधिक असतो, तेव्हा सावध राहा!– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

हिंदुत्वाचा वसा प्राण गेला तरी सोडणार नाही

दोन्ही मनं आता जुळली आहेत. एका युतीची पुढची गोष्ट सुरू झाली आहे. हे व्यासपीठ म्हणजे षण्मुखानंद सभागृहातलं व्यासपीठ नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं व्यासपीठ आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तेव्हा आता तुटणार नाही, फुटणार नाही, हिंदुत्वाचा वसा प्राण गेला तरी सोडणार नाही ही शपथ घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.  

देशद्रोह्यांविरुद्धचं कलम रद्द करणार्‍यांचा पराभव झाला याचा आनंद

दुसर्‍याच्या पराभवावर आनंद व्यक्त करणं हा माझा स्वभाव नाही. शिवसेनाप्रमुख म्हणायचे, जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यात आपला सिंहाचा वाटा आहे. तेव्हा तो आनंद साजरा करणारच. पण पराभव झाला तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना डरपोक म्हणून हिणवणार्‍या नालायकांचा. अशा औलादीला पंतप्रधान होऊ द्यायचं? बरं झालं, दणदणीत पराभव झाला. देशासाठी गद्दारी करणार्‍याला देशद्रोही ठरवण्याचं कलम रद्द करू म्हणणार्‍यांचा पराभव झाला याचा आम्हाला आनंद आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. कुणाच्या हाती देश चालला होता? आम्ही हिंदू म्हटलं तर यांना पोटशूळ होतं. ‘जय श्रीराम’ घोषणा लोकसभेत कशा दिल्या असा आक्षेप घेतला जातो. पण त्या ओवेसीच्या घोषणा तुम्हाला चालतात. हा ओवेसी देशाचे समसमान भागीदार असल्याचे सांगतो, मग ‘वंदे मातरम’ म्हणायला लाज का वाटते? पाकिस्तानात एक तरी हिंदू म्हणू शकेल का, आम्ही या देशाचे भागीदार आहोत म्हणून? पण एवढं स्वातंत्र देऊनही यांच्या डोक्यात किडा वळवळतो. हे आम्ही बघत राहायचं? ईव्हीएमच्या नव्हे, तर हिंदूंच्या डोक्यात फेरफार झालंय असं म्हणणार्‍यांच्या हाती देश द्यायचा, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मी माझ्या मित्राला बोलावलं, तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय!

शिवसेनेच्या व्यासपीठावर मी माझा वैयक्तिक मित्र, माझ्या मित्र पक्षाचा नेता, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांना बोलावलं. तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांना बोलावण्यात आलं होतं. शिवसेनेच्या व्यासपीठावरही याआधी प्रमोदजी आलेले आहेत, गोपीनाथराव आलेले  होते, नरेंद्र मोदीही शिवतीर्थावर आले आहेत. मध्यंतरी ही परंपरा खंडित झाली. मधल्या काळातला तणाव आता नाहीसा झाला आहे. लोकसभेच्या निकालानंतर केवळ शिवसेनेचेच खासदार नव्हेत, तर भाजपचे खासदारही भेटायला आले. काही ठिकाणी तर भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षाही शिवसैनिकांनी अत्यंत मनापासून काम केल्याचं त्यांनी सांगितलंय. तेव्हा कशाला लढत, कुंथत बसायचं. कारण यामध्ये जी पाच वर्षं वाया जातात ती केवळ तुमची-आमची नव्हे, तर संपूर्ण देशाची वर्षं वाया जातात़  हा एकोपा हवा. लढत बसून सोन्याची माती होऊ द्यायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.