कुलाबा आंबेडकर नगर, कफ परेडमधील पाणीप्रश्न पेटला; शिवसेनेकडून आझाद मैदानात जोरदार आंदोलन

कुलाबा आंबेडकर नगर, कफ परेडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेकडून झोपडपट्टी भागातील पाण्याच्या लाइन मनमानीपणे कापल्या जात असून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने रहिवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने आज शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात जोरदार आंदोलन करण्यात आले.

कुलाबा आंबेडकरनगर, कफ परेड या ठिकाणी झोपडपट्टी भागातील एकही लाइन कापली तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिवाय ज्या लाइन कापल्या गेल्या आहेत त्या तातडीने जोडण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी केली. या आंदोलनाची दखल घेत ‘ए’ वॉर्डचे सहायक आयुक्त मोरे, एसीपी देशमुख यांनी तोडलेल्या लाइन तातडीने जोडण्यात येतील आणि अशी कारवाई पुन्हा करण्यात येणार नाही, असे आश्वासही यावेळी दिले.

सदर आंदोलनामध्ये शिवसेनेचे उपनेते राजकुमार बाफना, उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर यांच्यासह विधानसभा संघटक गणेश सानप, सुरेखा परब, जयश्री बाळ्ळीकर, बिना दौंडकर, संपत ठाकूर, मनोहर पाटील, बाजीराव मालुसरे व शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे आयोजक उपविभागप्रमुख कृष्णा पवळे, शाखाप्रमुख महेंद्र कांबळी, संतोष पवार, महिला शाखा संघटिका सुरेखा सुलेकर, अंजली उज्जैनवाला व मोठय़ा संख्येने या विभागातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

वीस दिवसांत तोडगा काढा

पाणीप्रश्नासाठी आंदोलन करणाऱया रहिवाशांवर दाखल केसेस संदर्भात शिष्टमंडळाशी बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र पुढील वीस दिवसांत याबाबत प्रशासनाने तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईल जोरदार आंदोलन करण्यात येईल आणि याला पालिका आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.