
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या अभूतपूर्व यशाची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती करण्यासाठी फिर एक बार शिवशाही सरकार आणि अब की बार 220 पार हे घोषवाक्य घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यात विकासयात्रा काढणार आहेत अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुढचा मुख्यमंत्री कोणाचा असेल याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हेच घेतील अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेच्या मिळून जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात याकडे आमचा कटाक्ष असेल. मुख्यमंत्री कोणाचा हे त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे ठरवतील.
- शिवसेना -भाजप मिळून 220 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही ठरविले असल्याचे पाटील म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात ‘विकासयात्रा’ काढणार आहेत. पाच वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने काय विकासकामे केली याची माहिती ते याद्वारे देतील. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून ही यात्रा जाईल. फिर एक बार शिवशाही सरकार आणि अब की बार 220 पार हे घोषवाक्य तयार करण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.
- लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची तयारी भाजपाने सुरू केली आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपने 1 कोटी 11 लाख सदस्य बनविले होते. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता तीन महिन्यांत 25 लाख नवीन सदस्य करण्यात येतील. 5 बूथचे एक युनिट म्हणजेच शक्तिकेंद्र बनविण्यात येणार असून 20 हजार विस्तारक त्यासाठी काम करणार असल्याची माहिती चंद्रकात पाटील यानी दिली.
- राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलींना 9 महिन्यांचा बसचा पास, कपडे तसेच पावसाळी बूट देण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्ते त्यांची व्यवस्था करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विधानसभेसाठी 15 सप्टेंबरला आचारसंहिता?
राज्यात विधानसभेच्या निवडणुका या 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान होऊ शकतात. लोकसभेप्रमाणेच महिनाभर आधी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवत आतापासूनच विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.


























































