स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करू नका! शिवसेनेच्या शिष्टमंडळाची आज बेस्टवर धडक

मुंबईसह महाराष्ट्रात सर्वसामान्य रहिवाशांना घरगुती वापरासाठी अदानी कंपनीच्या स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती केली जाणार नाही, असे सरकारने पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. मात्र, तरीही रहिवाशांना अंधारात ठेवून स्मार्ट मीटर लावले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर, सरकारने दिलेल्या वचनाला जागावे, मुंबईत स्मार्ट मीटर लावू नयेत आणि लावलेले नवीन मीटर काढून पुन्हा जुने बेस्टचे मीटर लावावेत, या मागणीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ शुक्रवार, 2 ऑगस्टला दुपारी बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे.

मुंबईत सध्या अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीकडून नवीन स्मार्ट प्रीपेड मीटर बेस्टच्या ग्राहकाला कोणतीही सूचना, नोटीस न देता बदलण्याचे काम सुरू आहे. अदानी कंपनीचे स्वतःचे 30 लाख वीज ग्राहक असूनही या ग्राहकांना नवीन स्मार्ट मीटर लावण्यात आलेले नाहीत. पण बेस्टच्या 11 लाख ग्राहकांना लक्ष्य करून त्यांच्या माथी नवीन स्मार्ट मीटर मारण्याचे काम सरकार आणि अदानी करत आहेत. आतापर्यंत बेस्टच्या 3 लाख ग्राहकांचे मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावले आहेत. नवीन मीटरमुळे वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाला सामोरे जावे लागत आहे.

नव्या मीटरमुळे बेस्टचे मीटर वाचक, वीज वितरण कर्मचारी आणि रोख भरणा करणारे असे विविध खात्यातील कर्मचारी बेरोजगार होणार आहेत. या सगळ्याचा जाब सरकारला विचारण्यासाठी उद्या शिवसेनेचे शिष्टमंडळ बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे.

या शिष्टमंडळात शिवसेना गटनेते अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, अरविंद नेरकर, आमदार सुनील शिंदे, उपनेते सुहास सामंत, अरुण दुधवडकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, महेश सावंत, संतोष शिंदे, प्रमोद शिंदे, माजी बेस्ट अध्यक्ष अनिल कोकीळ, बेस्ट कामगार सेना सरचिटणीस रंजन चौधरी यांचा समावेश आहे.