रुग्णालयांसाठी सहायक आयुक्त नको, तर निवृत्त अधिष्ठात्यांची नियुक्ती करा-शिवसेना

554

पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या महत्त्वाच्या रुग्णालयांच्या कारभारावर देखरेख ठेवून सुधारणा करण्यासाठी विभागीय सहाय्यक आयुक्तांची नेमणूक ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र यामुळे संबंधित अधिकाऱयांच्या वॉर्डमधील कामावर विपरीत परिणाम होणार असल्यामुळे रुग्णालयांच्या या ‘सीईओ’ पदावर निवृत्त अधिष्ठातांची नेमणूक करावी अशी मागणी शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही दिवसांत पालिका रुग्णालयांच्या कारभारावरून सर्व स्तरातून टिका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने रुग्णालयांचा कारभार सुधारण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदांवर विभागीय सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली आहे. मात्र ही नियुक्ती करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप याआधी शिवसेनेसह सर्वपक्षीयांकडून गटनेत्यांच्या बैठकीत केला गेला. या पार्श्वभूमीवर ‘सीईओ’ नेमणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जाहीर केला होता. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वॉर्डच्या सहायक आयुक्ताला विभागातील कामांची मोठी जबाबदारी असताना त्यांच्यावर आणखी कामाचा बोजा टाकल्यास त्याचे विपरित परिणाम होणार असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या