समिती सभांसाठी उपहारगृहात पर्यायी व्यवस्था करा; शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

451

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. महानगरपालिकेच्या वैधानिक समित्या, प्रभाग समित्या, विशेष समित्यांचे कामकाज थांबले आहे. त्यामुळे मुख्यालयाच्या उपहारगृहात पर्यायी सभागृह तयार करून तिथे पालिका समितींच्या सभा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणली असली तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सभांवर बंदी, गर्दी टाळणे, मास्क आणि सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण करणे या सर्व बाबी काटेकोरपणे पाळल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे समित्यांच्या साप्ताहिक सभा, अन्य समित्यांच्या मासिक सभा गेले तीन महिने झालेल्या नाहीत. त्या त्या समित्यांपुढे अनेक महत्त्वाचे प्रस्ताव आले असून मंजुरीअभावी रखडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालयाच्या उपहारगृहाच्या जागेत पर्यायी सभागृह सुरू करून गेल्या तीन महिन्यांचे कामकाज करता येईल, तशी व्यवस्था करावी किंवा अन्य जागेचा शोध घ्यावा, अशी मागणी सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या