
गोराई चारकोपमधील मोकळय़ा भूखंडांची म्हाडाने पुन्हा सोडत काढावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत केली.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांनी 1985 ते 1995 दरम्यान जागतिक बँक गोराई-चारकोप प्रकल्पांतर्गत विभागात उच्च उत्पन्न गटासाठी 60, 80 व 100 मीटरच्या अनुषंगाने बंगले बांधण्याकरिता भूखंड वितरित केले आहेत. सदर भूखंड वितरित करताना त्यात नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.
60, 80 व 100 मीटरच्या भूखंडाचा उपयोग हा निवासी वास्तव्याकरिताच करण्यात यावा असे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. या मोकळय़ा भूखंडावर म्हाडाच्या सोडत दिनांकापासून तीन वर्षांच्या आत बांधकाम करण्याचीही अट महामंडळाने टाकली आहे; परंतु अद्यापही गोराई-चारकोपमधील सुमारे 60, 80 व 100 चौरस मीटरचे 400 ते 500 भूखंड हे बांधकामाविना मोकळे पडून आहेत. त्यामुळे म्हाडाने सोडत पद्धतीने वितरित केलेले आणि गेल्या 25 ते 30 वर्षांपासून मोकळे असलेले हे बंगल्यांसाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन सध्याच्या दराप्रमाणे पुन्हा सोडत काढावी व नवीन लाभार्थ्यांना सदर भूखंड वितरित करण्यात यावेत, अशी विनंती विशेष उल्लेख सूचनेद्वारे आमदार पोतनीस यांनी केली.