शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे (55) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 25 दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आणि आई असा परिवार आहे. गोरे यांनी चाकण विधान परिषदे गटाचे सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. 2014 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गोरे यांनी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 03 हजार 207 मते घेत विजय मिळवला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत सुरेश गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनामुळे शांत, संयमी पण सामान्यांच्या प्रश्नांसाठी कणखर भूमिका घेणारा एक उमदा सहकारी गमावला आहे. आळंदी खेडमधील अनेक लोकाभिमुख कामांसाठी त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अवेळी जाण्यामुळे गोरे कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तो सहन करण्याची त्यांना ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे