खोट्या वृत्ता विरोधात शिवसेना आक्रमक, अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

पेण तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांना नजरे समोर ठेऊन केवळ राजकीय आकसापोटी शिवसेनेला बदनाम करण्यासाठी एका स्थानिक वृत्तपत्रात खोट्या व बिनबुडाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नरेश गावंड यांनी पेण येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. सदरचे आरोप  सिद्ध करून दाखवा अन्यथा परिणामांना तयार रहा असे  आव्हान  गावंड  यांनी  केले.

या पत्रकार परिषदेला शहर प्रमुख ओमकार दानवे, वाहतूक  सेनेचे नरेश सोनवणे, चेतन मोकल,विजय  पाटील, तुकाराम म्हात्रे, युवा सेनेचे आशिष वर्तक,  अमित देशमुख, क्षितिज कदम, लहु पाटील,  दोषी  यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिलायन्स गॅस पाईप लाईन, जेएसडब्ल्यु कंपनीच्या नोकर भर्तीच्या वेळी तसेच खासदार निधी वाटपात शिवसेना पदाधिकांऱ्यानी हात धुवून घेतले असे वृत्त एका दैनिकाने छापले होते. सदर वृत्त निराधार असून या खोडसाळ वृत्ताचा निषेध करीत असल्याचे प्रतिपादन शिवसेना रायगड जिल्हा उपजिल्हा प्रमुख व पेण पंचायत समिती सदस्य नरेश गांवड यांनी केले.

जेएसडब्ल्यु कंपनीत काही महिन्या पूर्वी मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाली होती तसेच रिलायन्स गॅस लाईन टाकण्याचे काम करण्यात आले होते. तसेच खासदार निधी वाटपात टक्केवारी अशा आशयाचे निराधार वृत्तामुळे पक्षाची बदनामी झाली असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गावंड यांनी सांगितले.