
सामना प्रतिनिधी । नगर
शिवसेनेने राजकारणापेक्षा लोकांच्या प्रश्नांना महत्व देऊन ते सोडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक हे कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणारा पक्ष म्हणून शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे. सत्तेपेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेनेने केल्यामुळेच सत्तेत सहभागी असलो तरी प्रसंगी विरोध दर्शविण्यास शिवसेना मागे-पुढे पाहात नाही. शिवसेनेच्या वतीने शिबीराच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर सेवा पुरविली जात असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळला आहे, असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य सहसचिव रुपेश पाटील यांनी केले.
प्रभाग १२ मध्ये शहर शिवसेनेच्यावतीने नवीपेठ येथे आयोजित शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनेते अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दत्ता कावरे, संभाजी कदम, विक्रम राठोड, काका शेळके, परेश लोखंडे, विशाल वालकर आदी उपस्थित होते.
अनिल राठोड म्हणाले की, नागरिकांना आपल्या भागातच आरोग्य सेवा मिळावी, यासाठी या आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे, त्यांचा लाभ अनेकांना होत आहे. अशा शिबीराच्या माध्यमातून गरजू रुग्णांची सेवा होत असल्याने नागरिकही शिवसेनेच्या मागे उभे आहेत.
महापौर कदम म्हणाल्या की, नागरिकांना मुलभूत सुविधांबरोबर आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम शिवसेना करत आहे. बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संभाजी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. शिबीर यशस्वीतेसाठी अप्पू बेद्रे, संतोष तनपुरे, सागर थोरात, ऋषीकेश चाफे आदिंनी परिश्रम घेतले.



























































