शिवसैनिकांना सलाम करायला आलोय – आदित्य ठाकरे

1578

 

मातोश्रीचे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे संस्कार माझ्यावर झालेत. शिवसेना नेत्यांचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. 80 टक्के समाजकरण आणि 20 टक्के राजकारण हे शिवसेनेचे ब्रीद वाक्यच आहे. निवडणूक आली की अनेक पक्ष येतात मात्र शिवसैनिक अहोरात्र समाजासाठी झटत असतो त्या शिवसैनिकांना सलाम करायला मी इथे आलोय असे सांगत शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांविषयी आदर व्यक्त केला.चिपळूण शहरातील जनआशीर्वाद यात्रेत ते बोलत होते. ‘चिपळूण आणि शिवसेनेचे खास असे नाते आहे खरतर चिपळूणातले भगवे वातावरण पाहून प्रचाराला यायची गरज नाही थेट विजयी सभेलाच येईन असा प्रचंड आत्मविशास त्यांनी व्यक्त करताच शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

गुहागर येथून चिपळूण शहरात जनआशीर्वाद यात्रा पोहचताच शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर स्वागत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, समन्वयक प्रदीप बोरकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, सुनील मोरे,माजी आमदार सुभाष बने,जि.प.अध्यक्षा स्वरूपा साळवी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे,क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते.

शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 2013 च्या चिपळूणातील पहिल्या दौऱ्याची आठवण करून दिली होती.कबड्डी स्पर्धेसाठी आलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती आज त्याहून दुप्पट गर्दी आहे. तुमचे प्रेम वाढतेच आहे. माझी ही राजकीय यात्रा नाही. लोकसभेला जे भरभरून मतदान केलेत त्याबद्दल आभार मानण्यासाठी मी इथे आलोय. जे आपल्या विरोधात काम करत होते,ज्यांनी आपल्याला मतदान केले नाही त्यांची मने जिंकायला आलोय असे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या