तुमच्या साऱ्यांच्या आशीर्वादाने नवा महाराष्ट्र घडवणार – आदित्य ठाकरे

598

दुष्काळमुक्त, भयमुक्त, आत्महत्या मुक्त नवा महाराष्ट्र घडवणे हे माझे स्वप्न आहे. मात्र हे माझे एकट्याचे काम नाही यासाठी तुमच्या वज्र मुठीची, आशीर्वादाची गरज आहे. तोच आशीर्वाद मिळवण्यासाठी जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराराष्ट्राभर फिरतो आहे. मला तुमचा आशीर्वाद द्याल ना अशी भावनिक हाक खेड येथील जनआशिर्वाद यात्रेच्या वेळी युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घातली. त्यांच्या या हाकेला विराट जनसमुदायातून “हो” असा गगनभेदी नारा उमटला.

नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आदित्य ठाकरे महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी जनाशीर्वाद यात्रेवर निघाले आहेत. रविवारी शेवटच्या टप्प्यात त्यांचा खेड येथील गोळीबार मैदानावर विजयी संकल्प मेळावा पार पडला. ठीक 3.45 वाजता त्यांचे विजयी मेळाव्याच्या ठिकाणी आगमन झाले. आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच महिला ढोल पथकाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या ” कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला” अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. आदित्य ठाकरे यांच्या सोबत राज्याची पर्यावरण मंत्री, रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वाईकर व सचिन आहिर हे होते. या मेळाव्याला संबोधताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘या ठिकाणी मी संकल्प मेळाव्यासाठी आलो आहे. परंतु इथे असलेले भगवे वादळ पहिले तर आजचा हा मेळावा संकल्प मेळावा नाही तर विजयी मेळावा आहे असे मला वाटते. योगेश कदम याने गेली चार वर्ष घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आजचे हे भगवे वादळ पाहिले तर दापोली मतदार संघावर पुन्हा भगवा फडकणार यावर शिकामोर्तब झालेले आहे. आता फक्त सोपस्कार बाकी आहेत’

ते म्हणाले, गेल्या पाच वर्षात मी अनेकदा खेडमध्ये आलो, प्रत्येक वेळी मला खेडमध्ये भगवे वादळ दिसले मात्र तरीही या मतदार संघात शिवसेनेचा आमदार नसल्याचे दुःख मला सतावत होते. मात्र आता ते दुःख दूर होणार आहे. आजच्या मेळाव्याला जे भगवे वादळ निर्माण झाले आहे ती आगामी निवडणुकीत दापोली मतदार संघावर भगवा फडकणार याची नांदी आहे. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले आहे. आजही देत आहे आणि उद्याही देणार आहे हेच या भगव्या झंझावातून दिसत आहे. यानंतर येईन तो विजयी मिरवणुकीसाठीच येईन, निवणुकीत विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या