डोंबिवलीच्या पलावा पुलासाठी शिवसेना-मनसे एकजूट आंदोलन; सरकारच्या आश्वासनांचा समाचार, गाजर आणि नोटा दाखवत जोरदार निषेध

गेल्या सात वर्षांपासून लटकलेल्या पलावा पुलासाठी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी एकजूट दाखवत जोरदार आंदोलन केले. शिवसैनिकांनी गाजरे दाखवून तर मनसे कार्यकर्त्यांनी नोटा दाखवून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. सरकार आणि मिंधे पिता-पुत्रांच्या आश्वासनांचा समाचार घेतानाच एप्रिल फूल.. कब होगा पलावा पूल अशा घोषणा देत शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

कल्याण-शिळ रोडवरील पलावा पूल गेल्या सात वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे दररोज वाहनचालकांना आणि स्थानिक नागरिकांना वाहतूककोंडीचा भयंकर त्रास सहन करावा लागतो. इतकेच नव्हे तर या मार्गावर होणाऱ्या तुफान ट्रॅफिकमुळे अनेकदा शाळांना सुट्टीही जाहीर करावी लागते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने यावर वारंवार आवाज उठवला होता. त्यानंतर ३१ मे रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ३१ मेची डेडलाइनही उलटून गेली. मात्र या पुलाचे काम अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहे.

जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले. म्हात्रे यांनी या पुलाच्या उद्घाटनाची उपरोधिक निमंत्रण पत्रिकाच तयार केली होती. शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मनसेचे कार्यकर्तेही आंदोलनात उतरले. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनीही सरकारचा कडकडीत निषेध केला. सरकार सात वर्षांपासून तारीख बदलून फक्त गाजर दाखवत आहे. निधी मंजूर असून काम रखडले आहे. पुढेही असेच राहिल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा म्हात्रे यांनी दिला, तर जनतेच्या या प्रश्नासाठी एकत्र आंदोलन करायचे असे ठरवूनच शिवसेनेसोबत या आंदोलनात सहभागी झाल्याचे राजू पाटील यांनी सांगितले.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक तात्यासाहेब माने, महिला आघाडी जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे, उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, कल्याण तालुकाप्रमुख विजय भोईर, तालुका संघटक भगवान पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटक सदाशिव गायकर, डोंबिवली शहरप्रमुख अभिजीत सावंत, मुकेश भोईर, दिवा शहरप्रमुख सचिन पाटील, महिला शहर संघटक अक्षरा पटेल, ज्योती पाटील, योगिता नाईक, रिचा कामटेकर, युवासेनेचे आदित्य पाटील, अभिषेक ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.