बळीराजाला वाचवा! महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा!! संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आक्रमक

161

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून राज्यातील परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अतिरिक्त मदत जाहीर करत महाराष्ट्रात तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत शिवसेना खासदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसद परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत शिवसेना खासदारांनी लोकसभेत सभात्याग केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना खासदारांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी लावून धरली.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याकडे लक्ष वेधत शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खासदारांनी संसदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत, खासदार गजानन किर्तीकर, अरविंद सावंत, संजय उर्फ बंडू जाधव, प्रतापराव जाधव, राजन विचारे, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर, कृपाल तुमाने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित आदी खासदार उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी दोन हेक्टरपर्यंतच्या पिकांसाठी 8 हजारांची तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची प्रति हेक्टरी मदत घोषित केली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालांनी घोषित केलेली ही मदत अत्यंत तुटपुंजी असून केंद्र सरकारने अधिकची मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. राज्यातील गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना खासदारांना गळ्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या द्राक्षाच्या माळा घातल्या होत्या.

लोकसभेत सभात्याग

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यावर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच शिवसेना खासदारांनी महाराष्टात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर बोलण्याची संधी देतो, शांत बसा, असे सांगत ओम बिर्ला यांनी शिवसेना सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना खासदारांचा आक्रमक पवित्रा कायमच राहिला. लोकसभा अध्यक्ष तसेच सरकार पक्षाकडून न्याय मिळत नसल्याने सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेच्या निषेध करत शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला.

आपली प्रतिक्रिया द्या