
डोंबिवली पश्चिम भागात गेल्या दोन वर्षांपासून महानगर गॅसच्या पाइपलाइनचे काम पूर्ण होऊनही गॅसचे पाईप रिकामेच आहेत. डोंबिवलीकरांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा संताप व्यक्त करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
डोंबिवली पूर्व भागात महानगर गॅस कनेक्शन पूर्वीपासूनच सुरू आहे. मात्र पश्चिम भागातील सुमारे 90 टक्के भागात पाइपलाइन टाकूनही गॅस कनेक्शन सुरू नाही. पाइपलाइनला आता गंज लागत आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्व आणि
पश्चिमेला वेगळा न्याय का दिला जातो, असा संतप्त सवाल करत शिवसैनिकांनी रेल्वे स्थानक परिसरात निदर्शने केली. महानगर गॅस कंपनीने तत्काळ डोंबिवली पश्चिमेला गॅसपुरवठा सुरू करावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी दिला. आंदोलनात उपशहरप्रमुख शाम चौगले, चेतन म्हात्रे, सुरेश परदेशी, राजेंद्र सावंत, नितीन पवार, नंदू मालवणकर, अनिल मुथा, शेखर चव्हाण, आदित्य पाटील, संदेश कदम, प्रिय दांडगे, राकेश मोहिते, भारती नाचरे, साक्षी भांडे, अनिता जंगले, ममता सायगावकर, संदीप उबाळे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते
कोण म्हणतं देणार नाही…
डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाबाहेर शिवसैनिकांनी महानगर गॅस कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘महानगर गॅस हाय हाय’, ‘गॅस पाइपलाइन सुरू झालीच पाहिजे’, ‘कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.