रिफायनरीच्या विरोधात शिवसेनेची संघर्ष यात्रा

31

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर… भाजप सरकार जमीन चोर,एकच जिद्द रिफायनरी रद्द, एक दो एक दो भाजप सरकार फेक दो…रिफायनरी हटाव कोंकण बचाव, शिवसेना जिंदाबाद… घोषणांनी रविवारी नाणार परिसर दुमदुमून गेला. एकीकडे भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प कोंकणच्या माथी मारत असतानाच शिवसेनेने डोंगर तिठा येथून भर पावसात संघर्षयात्रा काढून रिफायनरी हद्दपार करण्याचा निर्धार केला.

शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रा काढली. यावेळी वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने शेतकरी आणि मच्छिमार संघर्ष यात्रेत सहभागी झाले. डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरवात झाली. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, उपनेते आणि आमदार उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार राजन साळवी व इतर पदाधिकारी या संघर्षयात्रेत सहभागी झाले होते. भरपावसात तीन किलोमीटर अंतरापर्यंत ही संघर्ष यात्रा निघाली. खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी होऊ देणार नाही अशी एकच घोषणा करताना ”रिफायनरीच्या विरोधात शिवसेना विधानभवन आणि संसदेत ही अधिवेशनात आवाज उठवणार आहे. सौदी अरेबियाला मुजरे करून तिकडच्या कंपन्यांशी करार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना हा प्रकल्प होऊ देणार नाही.” असे ठणकावून सांगितले.

अलीकडेच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सारखे फोन करत होते,काही मध्यस्थी भेटीसाठी विनवण्या करत होते पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोंकणाच्या पाठीशी ठाम राहिले आणि रिफायनरी रद्द करणार असाल तरच भेटा असं सांगून भेट नाकारली. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी असून कोंकण उद्धवस्त करणारे प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या