शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला भूमाफियांची धमकी; पोलीस उपायुक्तांचे कारवाईचे आदेश

जमिनीच्या वादातून खारघरमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांना भूमाफियांनी खुलेआम धमकावल्याचे समोर आले आहे. याबाबत पाटील यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान भूमाफियांच्या या उच्छादाची गंभीर दाखल घेत पोलीस आयुक्तांनी परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

भरत पाटील यांची खारघर विभागातील मूर्वी गावात भूखंड क्रमांक 34 (ब) येथे इमारत आहे. 2005 मध्ये सिडकोने सर्व्हे करून 2013 मध्ये तसा दाखलाही भरत पाटील यांना दिला आहे. ओवे ग्रामपंचायत अस्तित्वात असताना आणि आता पालिका आल्यानंतरही पाटील हे या भूखंडावरील घर नंबर 1055 ची घरपट्टी नियमितपणे भरत आहेत. दरम्यान भरत पाटील हे आपल्या घराच्या परिसरातील स्वतःच्या जागेत स्वखर्चाने बोअरवेल खोदत असताना याच गावातील मनोहर पाटील, पंकज पाटील, पवन पाटील, हर्षल पाटील, तुषार पाटील, मकरंद पाटील यांनी घटनास्थळावर येत हे काम बंद पाडले. याबाबत जाब विचारला असता या भूमाफियांनी मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप भरत पाटील यांनी केला आहे. आरोपी वारंवार आपल्या भाडेकरूंनाही धमकावत असल्याचे भरत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करतानाच कारवाईची मागणी केली आहे.

रोहा तहसील कार्यालयाच्या आवारात उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार किशोर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपणाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी तहसील तसेच प्रांत कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.