वृक्षांना नष्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, करवीर शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृक्षांचे रक्षण आणि संवर्धनासाठी गणना करून त्यावर क्रमांक टाकावा तसेच कचरा पेटवून नष्ट करणाऱया पर्यावरणद्रोहींवर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीसाठी गुरुवारी (दि. 6) करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वन खात्याच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन वनक्षेत्रपाल मारुती पाटील यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, कैलास जाधव, योगेश लोहार, बाळासाहेब नलवडे, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, अजित चव्हाण, किशोर कामरा, जितू चावला आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा हा प्रमुख जिल्हामार्ग पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कपडय़ांची बाजारपेठ असलेल्या गांधीनगरमधून जातो. हा रस्ता नव्याने करण्यात येत असल्याने, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याला अडसर करणारी झाडे तोडली आहेत. काही झाडे परवाना देण्याच्या अगोदर तोडली आहेत. तर काही झाडे वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर तोडली आहेत. त्यामुळे प्राणवायू पुरवणाऱया वृक्षांची संख्या अत्यल्प झाली आहे. सध्या शिल्लक राहिलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे पर्यावरणदृष्टय़ा गरजेचे आहे. पण काही दुकानासमोरचे वृक्ष कचरा पेटवून नष्ट करण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ज्यांना पर्यावरणाबद्दल कोणतेही सोयरसुतक नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.