ईव्हीएम असते तर त्यांना सर्वात वरचा क्रमांक मिळाला असता; संजय राऊत यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्त टोला

सध्या राज्य सरकारचे प्रगती पुस्तक जाहीर झाले असून अनेकांच्या कामांबाबतच्या चर्चा होत आहेत. या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या खात्यांना खालचा क्रमांक आला आहे, असे पत्रकारांनी सांगताच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना जहरदस्त टोला लगावला आहे.

राज्याचा प्रगतीपुस्तकात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची खाती खालच्या क्रमांकावर आहेत, त्याबाबत विचारले असता, संजय राऊत म्हणाले की, ते परीक्षा कधी देतात का, ते कॉपी करून सत्तेत आले आहेत. ते मेरीटवर या पदावर आले आहेत त्यामुळे त्यांचे प्रगती पुस्तक कसे असणार , त्यांनी कॉपी करण्याची संधीच मिळाली नाही. यातही कदाचित ईव्हीएम असते तर त्यांना सर्वात वरचा नंबर मिळाला असता, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला.

तसेच रायगडचे पालकमंत्रीपद कोणत्याही गावगुंडाला, भ्रष्टाचारी व्यक्तीला मिळू नये, राज्याच्या प्रगती पुस्तकात आदिती तटकरे यांचे चांगले काम दिसत आहे. त्यांना जिल्ह्याची चांगली माहिती आहे. राजकीय विरोध, मतभेद असले तरी त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद योग्य व्यक्तीला मिळावे, कोणत्याही गावगुंडाकडे हेपद जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.