मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात सुरुवातीला शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल यांना विजयी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर ईव्हीएममध्ये छेडछाड करत मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांना 48 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे हा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी चर्चेत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याच मतदारसंघाचा उल्लेख करत एक्सवर पोस्ट शेअर करत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही याबाबत पोस्ट शेअर केली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेत असे गैरप्रकार होत असतील तर लोकशाहीचा खून झाला आहे, असे समजावे लागेल, असा हल्लाबोलही त्यांनी मिंधे गट आणि भाजपवर केला आहे. तसेच आता भाजपमध्येच ताळामेळ नसल्याने येत्या काही महिन्यात दिल्लीत वेगळाच खेळ होई शकतो, अशी तोफही त्यांनी भाजपवर डागली.
एकदा जो गद्दारी करतो, तो कायमचा गद्दार असतो. मिंधे गटाच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवाराने लोकशाहीचा विश्वासघात केला आहे. निवडणूक आयोग सीसीटीव्ही फुटेज देत नाही, यातून आयोगाचाही यात सहभाग असल्याचे दिसून येते. चंडीगड प्रकरणात झालेल्या प्रकारात त्यांची प्रतिमा मलीन झाली होती, तसं पुन्हा घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून ही दृश्ये दिली जात नाहीत. असे जर होत असेल तर देशाता लोकशाहीचा खून झाला आहे, असेज समजावे लागेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
Once a traitor, always a traitor!
The case of the mindhe gang candidate from North West Mumbai gets murkier, as the gaddar candidate indulges in treachery with democracy now.
Surprisingly, or not, the Entirely Compromised- election commission, has refused to share CCTV footage… pic.twitter.com/hT27Bb2qDQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 16, 2024
आपण पाहिलं की एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमबद्दल ट्वीट केले आहे. ते तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत. आज जगात कोणत्याही देशात ईव्हीएमचा वापर होत नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आता मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात घोळ झाल्याची चर्चा आहे. यानंतर निवडणूक आयोगाने तेथील सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटातील एका नातेवाईकाकडे फोन होता. त्यांच्या फोनमध्ये एक अॅपही होते. त्याने ईव्हीएम मशीन अनलॉक करता येत होते. फोनवरून अॅप आणि ओटीपीने ईव्हीएम उघडू शकत असाल तर काहीही होऊ शकते. त्यामुळे आम्ही एवढेच म्हणतो की सीसीटीव्ही फुटेज द्या. पण ती हिंमत हे करत नाहीत. त्यामुळे गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे गैरप्रकार उघड झाल्यानंतरही मिंधे गटातील खासदारांना शपथ कशी देऊ शकता, असा रोखठोक सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजप, मिंधे गटाने एवढे गैरप्रकार केले, सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला. दबावतंत्र वापरले, तरीही जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना ईव्हीएममुळे 240 जागा मिळाल्या आहेत. ईव्हीएम नसते तर त्यांना 40 जागाही मिळाल्या नसत्या, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जनतेचा भाजपविरोधात प्रचंड रोष होता. त्यामुळे भाजपला जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. या देशात हुकूमशाही, मस्ती, माज चालणार नाही, हेच जनतेने भाजपला दाखवून दिले आहे.
…तर दिल्लीत वेगळाच खेळ होऊ शकतो
भाजप आणि एनडीएमध्ये ताळमेळ नाही. भाजपमधील काही नेते 400 पारच्या घोषणेबद्दल बोलतात, दुसरे आणखी काही बोलतात, काही थेट संविधान बदलायला निघाले आहेत, भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यात ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. ही निवडणूक जनतेची होती. जनतेने त्यांना जागा दाखवली. इंडिया आघाडी 237 वर आहे, तर भाजप 240 वर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची मला खात्री आहे. भाजपाचे राजकारण लोकांवर धाडी टाकण्याचे आणि धमक्या देण्याचे आहे, अशीही तोफही आदित्य ठाकरे यांनी डागली.