चार टकले गेल्याने काही फरक पडत नाही; संजय राऊत यांचा घणाघात

जळगावातील शिवसेनेची सभा कशी होणार? लोक येणार की नाही? अशा चिंतेच्या पखाली वाहणार्‍यांनी लक्षात ठेवावे, चार टकले गेल्याने काही फरक पडत नाही. चार टकले म्हणजे शिवसेना नाही. शिवसेना म्हणजे हा शिवसैनिकांचा अथांग सागर आहे, अशी तुफान टोलेबाजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेनेच्या वचनपूर्ती सभेत बोलताना संजय राऊत यांनी सभेच्या निमित्ताने करण्यात आलेल्या गलिच्छ राजकारणाचे वाभाडे काढले. या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येऊ नये, असा प्रयत्न चार टकल्यांनी केला. पण, खान्देशची जनता शिवसेनेवर प्रेम करणारी आहे. उद्धव ठाकरे आले, त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. ते आले, त्यांनी पाहिले आणि जिंकले… असा हा प्रसंग पाहून आता ते टकले बाहेरच पडणार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. चार गद्दार गेले, दहा निवडून आणू, असा ठाम विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महापौरांचे अधिकार दाखवावे लागतील
पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात खोडा घालण्याचा केविलवाणा प्रयत्न मिंधे सरकारने केला. त्याचा खरमरीत समाचार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला. महापालिका स्वायत्त असते आणि महापौरांना अधिकार असतात. हे अधिकार प्रशासनाला दाखवावे लागतील, असा इशारा दानवे यांनी दिला. पन्नास खोकेवाल्यांना कशाला बोलवायचे कार्यक्रमाला, असा टोलाही त्यांनी लगावला.