केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर येत आहेत. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शहांवर निशाणा साधला. त्यांचे मुंबईत काय काम आहे, मुंबई लुटण्यासाठीच ते येत आहेत. मणिपूरला जाऊन तेथील हिंसाचार रोखण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी मुबईत येण्याऐवजी मणिपूरला जाऊन परिस्थिती हाताळावी, असे आव्हानही संजय राऊत यांनी अमित शहा यांना दिले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखण्यात येत आहे. महाराष्ट्रात दळभद्री राजकारण करत महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आमचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे, महत्त्वाच्या संस्था, आर्थिक केंद्रे गुजरातला पळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे अमित शहा यांच्याबाबत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत, असे ते म्हणाले.
अमित शहा केंद्रीय गृहमंत्री असले तरी ते कमजोर गृहमंत्री आहेत. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. जम्मू क्शमीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू आहेत. देशातील कायदा सुव्यवस्थेकडे गृहमंत्र्यांचे लक्ष नाही. ते फोडाफोडीचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. मुंबई लुटणाऱ्यांना पाठिंबा देण्याचे काम ते करत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीसारखे स्वाभिमानी पक्ष फोडून महाराष्ट्र आणखी कमजोर करण्याचा त्यांचा डाव आहे. ही गृहमंत्र्यांची कामे नाहीत. मात्र, सध्या ते याच कामात गुंतले असून ते हीच कामे करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई आणि महाराष्ट्र कमजोर आणि दुर्बल करण्याचे स्वप्न आहे. यासाठीच ते नेहमी मुंबईत येत असतात. जनतेला आता त्यांचे डाव समजले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता त्यांना शत्रू मानत आहे. आता ते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत आहेत. त्यांनी मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला पळवले तसे लालागबाचा राजा ते गुजरात पळवून नेणार नाहीत ना, असा सवाल करत संजय राऊत यांनी शहा यांना जबरदस्त टोला हाणला. ते काहीही करू शकतात. हे व्यापारी आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत.देशात सर्वांना समान न्याय देण्याचे त्यांचे काम आहे. तसेच देशातील कायदासुव्यवस्था राखणे हे त्यांचे काम आहे. मात्र, पक्ष फोडणे, निवडणूक आयोगावर, न्याय संस्थेवर दबाव आणणे अशी कामे ते करत आहेत. अशा प्रकारचा गृहमंत्री देशात झाला होता, याची इतिहासात नोंद होईल, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना मुंबई आणि महापालिका त्यांना कमजोर करायची आहे. त्यामुळेच ते महापालिका, विधानसभा निवडणुका घेण्यात येत नाही. त्यांनी मुंबई, पुणे, नागपूर महापालिका लुटण्यासाठी त्यांच्या लोकांना दिली आहे. मुंबई लुटून त्यांचे दलाल त्यांना पैसे देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रत्येक महापालिका लुटण्याचा त्यांचा मोठा घोटाळा आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका घ्याव्या, असे आव्हानही त्यांनी दिले.