
युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशाचे पंतप्रधान टंगळमंगळ करत फिरत नाही, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा परिस्थितीत पंतप्रधान विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. हास्यविनोद करत आहे. त्यांच्या वर्तनातून देशाला युद्धाला सामोरे जायचे आहे, असे काहीही दिसत नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
ज्या देशात युद्धजन्य परिस्थिती असते, युद्धाची तयारी सुरू असते, त्या देशाचे पंतप्रधान राजधानीबाहेर टंगळमंगळ करत फिरत नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा बळी गेला. त्यानंतरही आमचे पंतप्रधान बिहारमध्ये प्रचाराला गेले. पाकिस्तानला धडा शिकवू, अशी घोषणा केली. त्यानंतर मुंबईत येत तब्बल 9 तास नटनट्यांसोबत मजेत वेळ घालवला. तसेच गौतम अदानी यांच्या एका बंदराच्या उद्घाटनाला गेले. त्यांना गळाभेट देत मैत्री दाखवली. त्यानंतर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासोबत हास्यविनोद करताना दिसले. देशात युद्धजन्य परिस्थिती असताना पंतप्रधान असे वर्तन करत आहेत. पंतप्रधानांची वर्तवणूक पाहता त्यांना पाकिस्तानशी युद्ध करायचे आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे, असे काहीही दिसत नाही. ते खुशालचेंडू भूमिकेत आहेत. मात्र, सगळा देश आणि आम्ही चिंतेत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.
आता विमाने उडवण्याची तयारी आणि युद्धसराव सुरू आहे. मात्र, युद्धसराव कायम सुरू राहण्याची गरज असते. आपल्याला चीन आणि पाकिस्तानसारखे शत्रू असेलेले शेजारी लाभले आहेत. त्यामुळे युद्धजन्य परिस्थितीतच नाही तर नेहमी युद्धसराव सुरू ठेवावा लागतो. हा संरक्षण क्षेत्राशी संबंधित विषय आहे. मात्र, पंतप्रधान किंवा सरकारचे वर्तन पाहता ते युद्धाला सामोरे जाणार आहेत, असे दिसत नाही. त्यांनी फक्त प्रसारमाध्यमांतू युद्ध सुरू केले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकल्याने तेथील राज्यकर्ते पळून गेल्याचे चित्र रंगवण्यात येत आहे. मात्र, युद्धाबाबत सरकार किंवा पंतप्रधान मोदी यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्यांची नेमकी काय मानसीकता आहे, ते बघावे लागेल, असेही ते म्हणाले.